महाराष्ट्र

Nana Patole : मतदार याद्या की मृगजळ?

Local Elections : नाना पटोले यांचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार

Post View : 81

Author

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची रणधुमाळी रंगली असून सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या निवडणूक होत आहेत. मात्र 2024 मधील विधानसभा निवडणुकीतील मतचोरीच्या वादामुळे वातावरण अधिकच संवेदनशील बनले आहे.

राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धडक भूमिका घेतली आहे. लोकशाहीचे अस्तित्व वाचवायचे असेल तर निवडणूक आयोगाविरोधात महाभियोगाची कारवाई करावी लागेल, असे ठाम मत पटोले यांनी व्यक्त केले आहे. यासाठी त्यांनी जनतेचा आधार घेण्याची तयारी दाखवली आहे. न्यायालयात जाण्यापूर्वी जनतेशी थेट संवाद साधून आंदोलनाची दिशा ठरवण्याचा निर्णय त्यांनी स्पष्ट केला आहे. राहुल गांधींनी बिहार येथून या मोहिमेची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातही त्याच पद्धतीने हा संघर्ष उभारण्याचे संकेत पटोले यांनी दिले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘आधी मतदार याद्या तपासून घ्या’ असा सल्ला दिल्यानंतर राजकीय वादाला आणखी उधाण आले आहे. याद्या तपासण्याच्या बाबतीतच मूलभूत प्रश्न उपस्थित करून नाना पटोले यांनी बावनकुळे यांच्या सल्ल्याला थेट प्रत्युत्तर दिले आहे.

Harshwardhan Sapkal : मतांचा पीन कोड कुणालाच माहित नाही

मतदार याद्यांवरून वादंग

नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे की, आजकाल निवडणुकींची पद्धत पूर्वीप्रमाणे राहिलेली नाही. अंतिम मतदार याद्या तयार झाल्यानंतरच त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केल्या जातात. त्यामुळे तपासणी करण्याचा सल्ला वास्तवाशी विसंगत असल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या नव्या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकींबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. बावनकुळे यांनी दिलेला सल्ला केवळ राजकीय दिशाभूल करणारा असल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. अंतिम याद्याच नसताना तपासणीचे काय प्रयोजन, असा मुद्दा त्यांनी स्पष्ट करून विरोधकांवर परखड टीका केली आहे. त्यामुळे मतदार याद्यांच्या पारदर्शकतेवर आणि त्यामागील प्रशासनाच्या जबाबदारीवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.

Harshwardhan Sapkal : ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आवाहन

अभ्यासाच्या अभावावर टीका

सर्व घडामोडीत नाना पटोले यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर थेट प्रहार केला आहे. निवडणूक प्रक्रियेचा नीट अभ्यास न करता अशा सूचना देणे हे गैरजबाबदारपणाचे द्योतक असल्याचे पटोले यांनी ठामपणे नमूद केले आहे. विरोधकांकडून उचलण्यात येणाऱ्या प्रत्येक मुद्द्यावर पटोले यांनी आपल्या खास शैलीत हल्लाबोल करत, राजकीय चर्चेला नवे वळण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लोकशाहीचे अधिष्ठान टिकवण्यासाठी मतदार याद्यांची अचूकता आणि पारदर्शकता ही अत्यावश्यक आहे. मात्र, निवडणूक आयोगाकडून आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून त्याबाबत आवश्यक दक्षता घेतली जात नाही. त्यामुळेच जनतेचा विश्वास डळमळीत होतो. काँग्रेस पक्ष या मुद्द्यावर ठाम उभा असून, भविष्यात याविरोधात तीव्र आंदोलन उभारले जाईल, असे पटोले यांच्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जवळ येत असताना, मतदार याद्या आणि त्यातील त्रुटींवरून निर्माण झालेला हा वाद आगामी निवडणूक लढतीसाठी नवे समीकरण तयार करणार आहे. एका बाजूला काँग्रेसकडून निवडणूक आयोगाविरुद्ध थेट लढाईची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे भाजपकडून या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची धडपड चालू आहे. नाना पटोले यांचा संघर्षात्मक पवित्रा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा प्रतिवाद यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापलेले आहे.

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित घोरमारे | Abhijeet S Ghorrmaare

अभिजित यांनी अनेक वर्ष सकाळ माध्यम समूहासोबत रिपोर्टर म्हणून काम केलं. साम टिव्हीचे ते रिपोर्टर होते. याशिवाय सरकारनामा या सकाळ समूहाच्या राजकीय वेब पोर्टलचे प्रतिनिधी देखील होते.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!