
राज्यातील पावसाळी अधिवेशनात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभारावर घणाघात केला आहे. शिक्षक नसणे, पुस्तकांची अनुपस्थिती आणि भरतीतील मेंढेपणावर त्यांनी सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सध्या राजकीय वादळाने गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात शेतकरी कर्जमाफी, शिक्षक घोटाळा आणि लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावरून जोरदार चर्चा रंगली. मात्र दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा शिक्षणाचाच मुद्दा केंद्रस्थानी आला. काँग्रेसचे नाना पटोले यांनी सरकारवर जळजळीत प्रश्नांचा भडीमार केला.
शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, पण या सरकारने त्याची अवस्था मेंढ्यांच्या कळपासारखी केली आहे, असा उपरोधिक टोला लगावत, पटोलेंनी शिक्षक भरतीतील अकार्यक्षमता आणि विद्यार्थ्यांच्या तुटक भविष्याकडे लक्ष वेधले. शिक्षक भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि स्थायित्वाचा अभाव असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.

Sudhir Mungantiwar : नवे विद्यार्थी मेरिटवर परिणाम करत नाहीत
वर्गांमध्ये रिकामेपणा
नाना पटोले यांनी भर सभागृहात शिक्षण विभागावर टीकेची झोड उठवली. पवित्र पोर्टलद्वारे भरती होणाऱ्या शिक्षकांमध्ये बरेचजण उच्चशिक्षित असतात. परीक्षा पास होतात, पण शिक्षकी पेशाला तुच्छ लेखत मोठ्या पगाराच्या संधी निवडतात. यामुळे सरकारी शाळांमध्ये शिक्षकांचा अभाव कायम राहतो. हे सगळं फक्त एकमेकांच्या पाठोपाठ अर्ज करणाऱ्या मेंढ्यांसारखं दिसतं, असं म्हणत त्यांनी भरती व्यवस्थेतील मूळ समस्येकडे बोट दाखवलं. यामुळे जिल्हा परिषद आणि महानगरपालिका शाळांमध्ये शिक्षकांची कायमस्वरूपी कमतरता निर्माण होते. वर्ग सुरु असतात, पण शिकवायला कोणीच नसतं. हे चित्र ग्रामीण भागात जास्त तीव्र असून, मुलांच्या शैक्षणिक भविष्यावर घाला येतो आहे.
राज्यात अनेक शाळा जूनमध्ये सुरु झाल्या, पण अजूनही हजारो विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तकं पोहोचलेली नाहीत. शैक्षणिक सत्र सुरु असताना मुलांना ना पुस्तकं मिळतात, ना शिक्षक मिळतात. यावरून सरकार शिक्षणाबाबत किती गंभीर आहे, हे दिसून येतं, असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. पुस्तकं वेळेवर पोहोचत नाहीत. मुलभूत सुविधा मिळत नाहीत. भरती प्रक्रियेत शाश्वततेचा अभाव आहे. तर याला जबाबदार कोण? विद्यार्थ्यांचे नुकसान कोण भरून काढणार? असा थेट प्रश्न सरकारला विचारत, त्यांनी यंत्रणेला मेंढेपणा सोडून जबाबदारीने वागण्याचा इशारा दिला.
Nitin Gadkari : शांततेचे दार बंद करून जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर
भविष्यासाठीची गुंतवणूक
भरती प्रक्रियेत एकाने अर्ज केला की उरलेले त्याच वाटेने चालतात. ना हेतू असतो ना सेवा करण्याची तयारी. हे मेंढ्यांचं वर्तन शिक्षणात नकोय. शिक्षक म्हणजे केवळ जागा भरणारे लोक नसतात, ते विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतात, असं म्हणत पटोलेंनी शिक्षक पदासाठी येणाऱ्या उमेदवारांमध्ये सेवा भावनेचा अभावही स्पष्ट केला. शिक्षण विभागाने केवळ संख्या भरून न थांबता गुणवत्ता आणि निष्ठेचा विचार करायला हवा. नाहीतर उद्याची पिढी न ज्ञान घेऊन बाहेर पडेल, ना स्वप्न घेऊन, असं स्पष्ट करत त्यांनी सरकारला सजग होण्याचा सल्ला दिला.
शिक्षण क्षेत्रातील ही अनिश्चितता आणि जबाबदारीपासून दूर पळणारी यंत्रणा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी थट्टा करत आहे. नाना पटोले यांचा सवाल आता जनतेचाही बनला आहे. मेंढेपणा थांबवून, शिक्षणासाठी एक ठाम आणि जबाबदार व्यवस्था निर्माण होईल का? या प्रश्नाचं उत्तरच राज्यातील पुढचं भविष्य ठरवणार आहे.