नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उंदरांचा वावर आणि एका महिला रुग्णावर उंदर फिरण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आरोग्य व्यवस्थेची गंभीर स्थिती उघडकीस आली आहे.
2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकारने सत्तेची सूत्रे हाती घेतली आणि विकासाच्या गाजरगप्पा सुरू केल्या. मात्र, या आश्वासनांच्या वाफाळलेल्या ढगांखाली आता आरोग्य व्यवस्थेच्या राबलेल्या जमिनीवर अस्वस्थता जाणवू लागली आहे. विरोधकांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे करत अनेक उदाहरणे समोर आणली आहेत. याच पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी यावरून सरकारची खरडपट्टी काढली आहे. कंधार येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उंदरांचे उघडपणे राज्य सुरू असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
एका महिला रुग्णावर चक्क उंदीर खेळताना दिसत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुग्ण झोपलेली असताना तिच्या अंगावर उंदीर बिनधास्त फिरत असल्याचे दृश्य पाहून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे.हे एखादे अपवादात्मक प्रकरण नाही. काही दिवसांपूर्वीच नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयात एका वयोवृद्ध रुग्णाच्या पायाला उंदराने चावा घेतल्याची घटना घडली होती. आता कंधारच्या रुग्णालयातही अशीच भयंकर घटना घडल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवले जात आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Sanjay Shirsat : शिस्तीचा धडा ऐकूनही मंत्र्यांचा तोंडफाटेपणा थांबला नाही
आरोग्य व्यवस्थेची अधोगती
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी या घटनेबद्दल थेट आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना उद्देशून सवाल केला आहे. उंदरांच्या या साम्राज्यावर मंत्री कोणती कारवाई करणार? त्या म्हणाल्या, ही आरोग्य व्यवस्थेची नाही, तर सरकारच्या बेजबाबदारपणाची जिवंत साक्ष आहे. यंत्रणेतील भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणामुळे जनतेचे जीव धोक्यात आले आहेत. यशोमती ठाकूर यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर कठोर टीका करताना म्हटले की, भ्रष्टाचाराने आणि बेजबाबदार कारभाराने राज्य व्यवस्थेला उंदीर कुरतडत आहे. हे सरकार केवळ आश्वासने देण्यात पटाईत आहेत. मात्र प्रत्यक्ष कृती कुठेच दिसत नाही. नागरिकांचे जीव असुरक्षित झाले आहेत.
सरकार निद्रिस्त अवस्थेत आहे. त्या पुढे म्हणाल्या, नांदेड सारख्या ठिकाणी जर उंदीर रुग्णांच्या अंगावर फिरत असतील, तर ही केवळ आरोग्य व्यवस्थेची नव्हे तर मानवी प्रतिष्ठेचीही अधोगती आहे. भाजप सरकारच्या काळात आरोग्य व्यवस्था पार गडगडली आहे. त्यांना त्याची अजिबात पर्वा नाही.या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामान्य नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर काय पावले उचलणार? सरकारी रुग्णालयात जर उंदरांचे राज्य असेल, तर जनतेला विश्वास ठेवावा तरी कुणावर? नांदेड जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेने केवळ आरोग्य यंत्रणेच्या असमर्थतेची नव्हे तर संपूर्ण प्रशासनाच्या बेशिस्त कारभाराची शोकांतिका उघड केली आहे. यशोमती ठाकूर यांच्या टीकेने राज्य सरकारची अडचण वाढली असून, जनतेला आता उत्तर हवे आहे.
Sudhir Mungantiwar : खड्ड्यांवर प्रहार, जनतेच्या सुरक्षेला आधार