
पुण्यातील आयईडी स्फोट कटप्रकरणातील फरार आरोपी अखेर एनआयएच्या जाळ्यात सापडले. जकार्ताहून परतताच मुंबई विमानतळावर दोघांची नाट्यमय अटक करण्यात आली.
देशाच्या सुरक्षेला मोठा धोका ठरलेल्या पुणे आयईडी कटप्रकरणात तब्बल वर्षभर फरार असलेल्या इस्लामिक स्टेटच्या (ISIS) स्लीपर सेलमधील दोन महत्त्वाच्या दहशतवाद्यांना अखेर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली आहे. या थरारक कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे अब्दुल्ला फयाज शेख ऊर्फ ‘डायपरवाला’ आणि तल्हा खान. हे दोघे इंडोनेशियातील जकार्ता शहरात लपून बसले होते, मात्र एनआयएने त्यांचा कसून शोध घेत त्यांना भारतात परतल्यानंतर थेट विमानतळावरच जेरबंद केले.
या आरोपींनी 2023 मध्ये पुण्यात आयईडी बनवण्याचा कट रचला होता. एनआयएच्या तपासात समोर आले की, 2022-23 या कालावधीत त्यांनी पुण्यातील कोंढवा भागातील एका घरात आयईडी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले आणि नियंत्रित स्फोटांची चाचणी देखील घेतली. त्यांच्या अटकपूर्वी या प्रकरणी अजामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. इतकंच नव्हे, तर या दोघांबाबत माहिती देणाऱ्यास प्रत्येकी तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. एनआयएच्या प्राथमिक तपासात धक्कादायक बाब उघड झाली आहे. या गटाने भारत सरकारविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचत, देशात इस्लामिक राजवट प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने योजनाबद्ध दहशतवादी कारवाया केल्या होत्या. त्यांनी सोशल मीडियाद्वारे कट्टर विचारांचा प्रसार करून तरुणांना गटात सामील करण्याचे प्रयत्नही केले होते.

Yavatmal : लाचलुचपत विभागाचा लायसन्स घोटाळ्यावर जोरदार ब्रेक
अनेक आरोपी ताब्यात
या प्रकरणात आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अलीकडे अटक करण्यात आलेले अब्दुल्ला शेख ऊर्फ ‘डायपरवाला’ आणि तल्हा खान यांच्यासह या यादीत मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी, अब्दुल कादिर पठाण, सिमाब काझी, झुल्फिकार बारोडावाला, शमिल नाचन, आकिफ नाचन आणि शहनवाज आलम या व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्या विरोधात UAPA, स्फोटक पदार्थ कायदा आणि IPCच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्रकरणाचा तपास अधिक खोलवर सुरु आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेचा उद्देश या दहशतवादी कटाचा संपूर्ण भांडाफोड करून, प्रत्येक दोषीला न्यायालयासमोर उभे करण्याचा आहे.
Voice of India : खासदारांचे शिष्टमंडळ जागतिक मंचावर मांडणार भारताची बाजू
देशांतर्गत सुरक्षेसाठी इशारा
या प्रकरणामुळे भारतात सक्रिय असलेल्या दहशतवादी नेटवर्क्सविषयी चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. स्लीपर सेलमधील हे आरोपी भारतात राहून, देशविरोधी कट रचत होते, हे धक्कादायक वास्तव आहे. एनआयएसारख्या यंत्रणांच्या सतर्कतेमुळेच हे थेट कारवाईत उघडकीस आले आहे. भविष्यातील अशा कटांना हाणून पाडण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी अधिक सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. तपास यंत्रणांचे लक्ष आता या गटाचा मेंदू असलेल्या सूत्रधारांकडे वळले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी फरार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही सहकार्य घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न एनआयए करत आहे.