प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवर बहुजन समाजावरील दशकांपासूनच्या अन्यायाचा आरोप करत गांधी कुटुंबाचा पर्दाफाश केला. मंडल आयोग, जातीय जनगणना आणि आरक्षण रोखल्याचा ठपका त्यांनी ठामपणे ठेवला.
वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा आणि थेट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदार प्रखर नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर आणि गांधी कुटुंबावर तिखट शब्दांत आरोपांची झोड उठवली आहे. जातीय जनगणनेच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर यांनी हा फक्त बडेजावाचा देखावा असून, वास्तविकतेत हा बहुजन समाजावर दशकेभर करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा इतिहास असल्याचे ठामपणे सांगितले.
राहुल गांधी यांनी अलीकडेच एका भाषणात ओबीसींना हक्क न मिळाल्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. यावर प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र आक्षेप नोंदवत सांगितले की, ही जबाबदारी स्वीकारणे म्हणजे केवळ ढोंगी नैतिकतेचा देखावा आहे. प्रत्यक्षात ही चूक नव्हे, तर बहुजनांवर केलेला संगठित अन्याय आणि व्यवस्थात्मक गुन्हा आहे, ज्यामध्ये संपूर्ण काँग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंब पूर्णतः जबाबदार आहे.
Nagpur : नव्या आरक्षण गणितानं बदलली नागपूरच्या निवडणुकीची दिशा
जातीय जनगणनेचा मुद्दा
प्रकाश आंबेडकर यांनी इतिहास उलगडत सांगितले की, मंडल आयोगाचा अहवाल 1980 मध्ये तयार झाला असतानाही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तो तब्बल दहा वर्षे गोपनीय ठेवला. ही बाब बहुजनांच्या राजकीय आणि सामाजिक प्रगतीला रोखण्यासाठी मुद्दाम केली गेली, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद भूषवताना मंडल आयोगाच्या अंमलबजावणीविरोधात संसदेत उघडपणे भूमिका मांडली होती. त्यांच्या विरोधाचा पुरावा लोकसभेतील भाषणांमध्ये आजही उपलब्ध आहे. या काळात व्ही. पी. सिंग यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी मंडल आयोग लागू करत ओबीसींना 27 टक्के आरक्षण दिले. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांचेही महत्त्वाचे योगदान होते.
सोनिया गांधी यांच्याअध्यक्षतेखालील यूपीए सरकारनेही जातीय जनगणनेचा मुद्दा वारंवार दबवण्याचा प्रयत्न केला. 2011 मध्ये समाजवादी पक्षांनी जनगणनेत जातीचा उल्लेख करण्याची मागणी केली होती. मात्र, तेव्हा गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी या मागणीला तीव्र विरोध केला. बहुजन समाजाच्या आकडेवारीचा धोका लक्षात घेत काँग्रेसने हार मानत जनगणना तर केली, मात्र आजतागायत तिचे आकडे सार्वजनिक केलेले नाहीत. हे केवळ आकडे दडपणे नव्हे, तर बहुजन समाजाच्या अस्तित्वावरच घाला घालण्याचा प्रयत्न असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले. त्यांच्या मते, ही माहिती न देता बहुजनांना त्यांच्या हक्कांपासून दूर ठेवण्याचा हा अजेंडा आहे, ज्याचे केंद्रस्थान गांधी कुटुंबच आहे.
बहुजन समाजावरील अन्याय
प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधी यांच्या बहुजन समाजाशी जोडण्याच्या प्रचारकी उपक्रमांवरही बोचरी टीका केली. जय भीमची घोषणा देणे, दलित वस्त्यांमध्ये जाऊन फोटो काढणे, मंदिर-मशीद-मठांचे दौरे करणे हे सगळे केवळ एक राजकीय स्टंट असल्याचे आंबेडकर यांनी ठासून सांगितले. अशा कृतींमधून बहुजनांच्या व्यथा समजण्याचा दिखावा होतो, परंतु खऱ्या समस्या आणि त्यांच्या उपाययोजना याकडे दुर्लक्षच होते.
प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, बहुजनांना वंचित ठेवण्याच्या या षड्यंत्रात गांधी कुटुंबातील चार पिढ्या सामील आहेत, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी. या सगळ्यांनी मिळून बहुजनांच्या हक्कावर गदा आणली आहे. ही केवळ चूक नव्हे, तर इतिहासात नोंदवायला हवी अशी एक गंभीर गुन्हा प्रक्रिया आहे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
राजकीय भाषणांत थोडीशी सहानुभूती दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांविरोधात प्रकाश आंबेडकरांचा हल्ला अत्यंत मुद्देसूद, ठोस आणि पुराव्यांवर आधारित होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात जातीय जनगणना, ओबीसी आरक्षण आणि बहुजन प्रतिनिधीत्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेस पक्षाला अधिक कठोर प्रश्नांना सामोरे जावे लागणार आहे.