महाराष्ट्र

Rohit Pawar : भाजपला सोडा, पुन्हा एकत्र या!

Bhandara : रोहित पवारांची अजित पवारांना साद

Post View : 28

Author

भंडाऱ्यातील अधिकार मार्चच्या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी मोठा राजकीय इशारा दिला आहे. या विधानामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा वेग आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या काका व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला आहे. अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचा त्याग केल्यास दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येतील, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची राज्यभरात सुरू असलेली मंडळ यात्रा बुधवारी भंडारा जिल्ह्यात पोहोचली. या यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांना संबोधित करताना रोहित पवार यांनी आपल्या वक्तव्यातून राजकीय चर्चेला नवे वळण दिले.

रोहित पवार यांनी आपल्या भाषणात भाजपविरोधी भूमिका ठामपणे मांडली. त्यांनी नमूद केले की, लढाई ही केवळ पक्षीय पातळीवर नसून भाजपच्या विचारसरणीविरुद्ध आहे. अजित पवार यांनी भाजप सोडून शरद पवार यांच्या प्रगतिशील विचारधारेचा स्वीकार केला तर सर्व पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करून पुढे जाण्याचा विचार केला जाईल आणि यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Nagpur Police : नियम मोडला? आता वाहन होणार जप्त

नवे समीकरण

शिवसेनेतील फाटल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडली. बहुतांश आमदार अजित पवारांच्या गटात गेले आणि पक्षाचे नेतृत्व त्यांच्या हाती गेले. यानंतर शरद पवार यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार’ नावाने नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाला लोकसभा निवडणुकीत यश मिळाले, परंतु विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाबाबत चर्चांचा उगम झाला, मात्र त्या प्रत्यक्षात कधीच आल्या नाहीत. आता रोहित पवारांच्या विधानामुळे या चर्चांना पुन्हा चालना मिळाली आहे.

आपल्या भाषणात रोहित पवार यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान चोरी झाल्याचा गंभीर आरोप केला. राहुल गांधी यांनी या विषयावर पुरावे सादर केले आहेत. आमच्याकडेही त्याचे ठोस पुरावे आहेत, असे त्यांनी सांगितले. हे पुरावे टप्प्याटप्प्याने लोकांसमोर आणले जातील. मतदान चोरी म्हणजे लोकशाहीची चोरी आणि अशा परिस्थितीत गरीबांना न्याय मिळणे अशक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सत्ताधारी पक्षाने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण केलेली नसल्याचीही त्यांनी टीका केली.

Corporation Election : नागपूर, चंद्रपूरला 50 कोटींची लॉटरी

संघर्षाची भूमिका

आपल्यावर ईडीची कारवाई झाल्याचे सांगत रोहित पवार यांनी मराठी माणूस नेहमी लढाईसाठी सज्ज असतो, हा आपला स्वभाव आहे, असे ठामपणे मांडले. कारवाईच्या भीतीने काही जण सत्तेकडे गेले असले तरी बहुतांश कार्यकर्ते आपल्या विचारांशी निष्ठावान असल्याचा त्यांचा दावा आहे. आगामी काळात यश आपल्याच पायाशी असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अधिकार मार्च आयोजित करण्यात आला होता. मुसळधार पावसातही या मार्चला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या मार्चमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहितदादा पवार, माजी आमदार सुनील भुसारा, ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापुरकर तसेच सर्व जिल्हास्तरीय आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक व युवतींचा सहभाग होता.

मार्चदरम्यान शेतीमालाला हमीभाव, कर्जमाफी, पिकांचे तात्काळ नुकसानभरपाई आणि शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध या मागण्या जोरदारपणे मांडल्या गेल्या. पावसाची पर्वा न करता नागरिकांनी खांद्याला खांदा लावून एकतेची ताकद दाखवून दिली. पाऊस आणि वीज यांची तमा न बाळगता उपस्थित राहणाऱ्यांचे या प्रसंगी विशेष आभार मानण्यात आले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!