शिवसेना शहर प्रमुख समीर शिंदे यांची वेठबिगार कामगारांच्या मुक्ततेसाठी स्थापन केलेल्या विशेष समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उपराजधानी नागपूरमधील स्थानिक समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवणारे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे शहर प्रमुख समीर शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शहरातील रस्त्यांपासून ते प्रशासनाच्या दरबारापर्यंत, त्यांनी लोकांचा आवाज पोहोचवला आहे. शासन दरबारी तक्रारी मांडण्याची त्यांची चिकाटी आणि लोकांच्या न्यायासाठीचा त्यांचा लढा यामुळेच ते अनेक नागपूरकरांच्या मनात निष्ठावंत नेता म्हणून ओळखले जातात.
आता त्यांच्या या कार्याची दखल घेत, वेठबिगार प्रथेमधून कामगारांची मुक्तता करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा करताना त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी पत्रात लिहिले की, समाजातील वंचित व शोषित घटकांच्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी तुमचा अनुभव आणि सामाजिक जाणीव नक्कीच मोलाची ठरेल. आपण ही जबाबदारी कार्यक्षमतेने आणि यशस्वीपणे पार पाडाल, अशी मला खात्री आहे.
Devendra Fadnavis : देवाभाऊंच्या वेगवान विचारांमुळे उपराजधानीला गतीची भेट
कर्जाच्या ओझ्याखाली पिढ्या
वेठबिगार म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध कामाला लावणे, कमी मोबदला देणे किंवा अजिबात मोबदला न देता सक्तीने काम करून घेणे. ब्रिटिश काळात ही प्रथा शेतशाही, जमीनदारी आणि सत्ताधारी वर्गाच्या शोषणाचे मोठे साधन होती. स्वातंत्र्यानंतर 1976 मध्ये भारतीय संविधानात सुधारणा करून जबरदस्तीची मजुरी (Bonded Labour) बंदी घालण्यात आली. तरीही अनेक भागात, विशेषतः ग्रामीण व आदिवासी विभागात, ही प्रथा पाय पसरून बसलेली आहे. नागपूर जिल्ह्यातील काही भागात, शहराच्या काठावर आणि ग्रामीण पट्ट्यात आजही काही ठिकाणी ही अमानुष प्रथा टिकून आहे.
अनेक आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे कर्जाच्या ओझ्याखाली दबून, पिढ्यान् पिढ्या एका ठराविक घराण्याच्या किंवा ठेकेदाराच्या सक्तीच्या मजुरीत अडकून पडतात. त्यांना केवळ पैशांची नव्हे तर सन्मानाचीही हानी सहन करावी लागते. समीर शिंदे यांनी याच विषयावर गेल्या काही काळापासून सातत्याने लक्ष वेधले. अनेकदा शहरात आणि ग्रामीण भागात कामगारांच्या समस्या प्रत्यक्ष पाहून, त्यांनी शासनापर्यंत ती आवाजाच्या ताकदीने पोहोचवली. अनेक ठिकाणी छावण्या भरवून, पीडित वेठबिगारांना मदत, सल्ला आणि कायदेशीर मार्गदर्शन देण्याचे कार्य त्यांनी केले.
समाजासाठी बदलाची आशा
आता महसूल विभागाने तयार केलेल्या या समितीवर त्यांची नियुक्ती झाल्याने, शहरातील आणि आजूबाजूच्या भागातील वेठबिगारांना मोठी दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, समीर शिंदे यांचा आधीचा ट्रॅक रेकॉर्डही यशस्वी आहे. त्यांनी मांडलेल्या अनेक तक्रारींवर शासनाने तातडीने निर्णय घेत, नागपूरकरांच्या अडचणींना तोडगा काढला आहे. ही समिती आणि त्यावर समीर शिंदे यांची भूमिका, या समाजाच्या आयुष्यात बदल घडवू शकते, असा विश्वास अनेक सामाजिक संघटनांनी व्यक्त केला आहे.
