संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली, पश्चिम विदर्भातील शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी संघटनात्मक तयारी सुरू केली आहे.
विदर्भाच्या पश्चिम भूमीत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची ललकारी जोरात वाजू लागली आहे. सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षाने कंबर कसली असताना, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा झंझावात वेगाने पुढे सरकतोय. या रणसंग्रामात यवतमाळचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे दिग्गज आमदार संजय राठोड यांनी आपली तलवार म्यानातून बाहेर काढली आहे. अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकारी संवाद बैठकीत राठोड यांनी आपल्या खणखणीत शैलीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत निवडणुकीच्या तयारीला गती दिली.
संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने विदर्भात आपली पकड मजबूत करण्याचा चंग बांधला आहे. या बैठकीत संजय राठोड यांनी शिवसैनिकांना एकजुटीने लढण्याचा मंत्र दिला. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील संघटनात्मक रचनेवर भर देत, पक्षाच्या प्रत्येक शाखेला बळकट करण्याचे आवाहन केले. अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीममधील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, शाखा प्रमुख, महिला आघाडी आणि युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत मोठ्या संख्येने हजेरी लावली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी राठोड यांच्या नेतृत्वाला पाठबळ देत उपस्थितांना प्रेरणा दिली.
Parinay Fuke : दादांच्या कुशल चालीने पूर्व विदर्भात महायुतीचे वर्चस्व अबाधित
गावागावात जनसंपर्क वाढवावा
राठोड यांनी कार्यकर्त्यांना गावागावात जनसंपर्क वाढवण्याचे आणि प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिमेला गती देण्याचे निर्देश दिले. संजय राठोड यांनी या बैठकीत निवडणुकीसाठी एक सुस्पष्ट रणनीती मांडली. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन जिल्हाप्रमुख नेमण्याचा प्रस्ताव ठेवला. ज्यांच्या कार्यक्षेत्रात दोन ते तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. यामुळे पक्षाचे जाळे अधिक मजबूत होईल आणि प्रत्येक गावापर्यंत शिवसेनेचा आवाज पोहोचेल, असा त्यांचा विश्वास आहे. राठोड यांनी यापूर्वी मुंबईत झालेल्या पाच बैठकींचा दाखला देत, संघटनात्मक बळकटीकरण, सक्रिय सदस्य नोंदणी आणि जनसंपर्क अभियानाचे नियोजन यावर घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेना आता प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहे. ज्यामुळे स्थानिक पातळीवरील सूचना आणि गरजांनुसार पक्षाची दिशा ठरेल. राठोड यांचा जोश आणि कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक यामुळे विदर्भातील शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्यांनी महिला आणि युवा आघाडीला विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. जेणेकरून पक्षाची ताकद आणखी वाढेल. आम्ही गावागावात शिवसेनेचा झेंडा फडकवू, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचू आणि निवडणुकीत विजय मिळवू, असा दमदार विश्वास राठोड यांनी व्यक्त केला. त्यांच्या या रणनीतीमुळे शिवसेना एकनाथ शिंदे गट विदर्भात नव्या जोमाने निवडणुकीच्या रणांगणात उतरत आहे. आगामी काळात राठोड यांच्या नेतृत्वात शिवसेना कशी कामगिरी करते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
Prashant Padole : पूरग्रस्त नागरिकांचे तारणहार बनले काँग्रेस खासदार
