अकोलात भाजपने महापालिका निवडणुकीसाठी वैद्यकीय आघाडी आणि कार्यकर्त्यांच्या सहभागातून सक्रिय मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावत आहे. भारतीय जनता पक्ष (भाजप) देखील मागे नाही. अकोला जिल्ह्यातील मराठा मंगल कार्यालयातील नामदेवराव पोहरे सभागृहात नुकतीच भाजपच्या वैद्यकीय आघाडीच्या पश्चिम विदर्भ संमेलनाने सर्वांचे लक्ष वेधले. या संमेलनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना विजयाचा नारा दिला. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचे आणि वैद्यकीय क्षेत्राचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
विदर्भात भाजप आणि महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे त्यांनी सांगितले. भाजपच्या वैद्यकीय आघाडीने समाजातील प्रत्येक थरापर्यंत पोहोचण्याचा संकल्प केला आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, डॉक्टर हा समाजाचा अविभाज्य भाग आहे. त्यांच्याकडे सामाजिक जाण आणि सर्वसामान्यांशी नाळ जोडण्याची ताकद आहे. ही ताकद पक्षाच्या विस्तारासाठी वापरली जावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉक्टरांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पक्ष कटिबद्ध असून, सरकारी योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यात वैद्यकीय आघाडीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे त्यांनी नमूद केले.
Devendra Fadnavis : सातनवारी गाव बनले स्मार्ट इंटेलिजेंट विलेज
दलित वंचितांना आधार
खासदार अनुप धोत्रे यांनीही यावेळी आपले विचार मांडले. ते म्हणाले, वैद्यकीय आघाडीने समाजातील दलित, वंचित आणि आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना आधार द्यावा. पक्षाच्या विचारधारेला बळकटी देण्यासाठी आणि मतदान जागृतीसाठी डॉक्टरांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. त्यांनी वैद्यकीय तज्ज्ञांची एक विशेष टीम तयार करण्याचा प्रस्ताव मांडला, ज्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला वैद्यकीय सुविधांचा लाभ मिळेल. संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी संघटनेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, संघटना ही पक्षाचा कणा आहे.
सर्व जाती-धर्मांना एकत्र आणून पक्षाला मजबूत करणे हे आपले ध्येय आहे. यावेळी डॉ. बाळासाहेब हरपाले यांनी अध्यक्षीय भाषणात वेगवेगळ्या वैद्यकीय पॅथीतील तज्ज्ञांना एकत्र आणण्याचे आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी आपण सर्वांनी खारीचा वाटा उचलावा, असे ते म्हणाले. या संमेलनाने अकोला जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित करण्यासाठी वैद्यकीय आघाडी आणि कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत. विदर्भातील प्रत्येक गाव, प्रत्येक वाडीपर्यंत भाजपचा विचार पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त झाला.
