वर्ध्यात रामनगर पोलिसांनी 2.556 किलो गांजासह तीन आरोपींना अटक केली. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.
जिल्ह्यात अमली पदार्थांच्या अवैध विक्रीवर आळा बसवण्यासाठी पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. 7 जुलै रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामनगर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पोलिसांनी कारवाई करत तब्बल 2.556 किलोग्रॅम गांजा जप्त केला. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण 2 लाख 12 हजार 940 रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
गांजाची ही तस्करी जिल्ह्यात अंमली पदार्थांचे वाढते जाळे दर्शवते. पोलिसांनी वेळेवर कारवाई करत संभाव्य मोठा गैरव्यवहार रोखला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पोलिस यंत्रणेच्या सतर्कतेचे दर्शन घडले आहे.
Akash Fundkar : बांधकाम मजुरांपासून झोमॅटो वर्करपर्यंत कामगार सुरक्षा क्रांती
अटक आरोपींची ओळख
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये प्रणाली श्रीकांत भिसे ऊर्फ प्रणाली धीरज लेंडे, मयूर गजानन नाकडे आणि रविंद्रसिंह ऊर्फ कालू लखनसिंह जुनी यांचा समावेश आहे. या तिघांच्या ताब्यातून 2.556 किलोग्रॅम गांजा आणि रोख रक्कम व इतर मालमत्ता मिळून एकूण 2 लाख 12 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
ही कारवाई अत्यंत नियोजनबद्ध रितीने पार पडली. पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या स्पष्ट निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी हे ऑपरेशन राबवले. या मोहिमेत पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, उपनिरीक्षक उमाकांत राठोड, प्रकाश लासुंटे यांच्यासह संपूर्ण तपास पथकाने कुशल कामगिरी बजावली. फॉरेन्सिक विभागाचे एस.एफ. अनिल सातोने आणि पी.एच. मंगेश धामंडे यांनीही तपासात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला.
प्रभावी भूमिका
राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करीचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर वर्धा पोलिसांची कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात आहे. नागपूरमध्येही याच काळात मोठी गुन्हेगारी टोळी उघडकीस आली. नागपूर ग्रामीण पोलिसांनी कुख्यात गुल्लू वर्मा टोळीवर मकोका कायदा लावत कठोर कारवाई केली आहे. या दोन्ही घटनांचा परस्पर संबंध नसला तरी, दोन्ही कारवायांमध्ये पोलिस दलाचा ठाम आणि परिणामकारक हस्तक्षेप दिसून येतो. अंमली पदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतल्यामुळे नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थाच्या साखळीवर मोठा घाव घातला. डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भात अधिकृत माहिती दिली. राज्यभरातील पोलिस दल अंमली पदार्थविरोधात सशक्तपणे उभे राहत आहेत. यामध्ये वर्धा पोलिसांनी दिलेला वाटा लक्षणीय आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा प्रकारच्या अवैध कारवायांबाबत पोलिसांना सहकार्य करावे, असा संदेशही या कारवायांमधून मिळतो. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम समाजावर खोलवर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे पोलिसांचे हे प्रयत्न केवळ कायदा सुव्यवस्थेसाठी नाही, तर नव्या पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठीदेखील आहेत.