स्वारगेट बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला. यावर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी वक्तव्य केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. त्यानंतर योगेश कदम यांनी आपल्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे.
पुण्यातील स्वारगेट बसस्थानक परिसरात तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी केलेल्या एका विधानावरून मोठा वाद निर्माण झाला. कदम यांच्या विधानामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. अखेर या वादावर योगेश कदम यांनी स्वतः खुलासा करत विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले.
स्वारगेट घटनेनंतर मंत्री योगेश कदम यांनी पाहणीसाठी घटनास्थळी भेट दिली होती. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, विकृत मानसिकतेचा एक पुरुष काही मिनिटांत मुलीचे ब्रेनवॉशिंग करतो. त्यानंतर अत्याचाराची घटना घडते. त्या ठिकाणी कुठलाही गोंधळ, वादविवाद किंवा बळजबरी झाली नाही. सगळं काही शांतपणे घडलेलं आहे, त्यामुळे आसपासच्या लोकांनाही काही समजले नाही, असे कदम म्हणाले होते. या वक्तव्यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महिलेवर अत्याचार शांतपणे घडला असो वा गोंधळात, हा गुन्हा आहे आणि मंत्री त्याचे समर्थन कसे करू शकतात?” असा सवाल करत विरोधकांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
विरोधकांचा निशाणा
योगेश कदम यांच्या या विधानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. महिलांवरील अत्याचार कुठल्याही परिस्थितीत निंदनीय आहे. मंत्री अशा घटनांना शांतपणे घडले म्हणून गांभीर्याने घेत नाहीत का? असा सवाल करत विरोधकांनी कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सोशल मीडियावर देखील कदम यांच्या विधानावर जोरदार टीका होत आहे.
विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी विरोधकांना सुनावत सांगितले, मी पण एका मुलीचा बाप आहे. महिलांबाबतच्या संवेदना मला पूर्णपणे माहिती आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीमुळे आम्हाला स्त्रियांबाबत आदर आणि संवेदनशीलता लहानपणापासूनच शिकवली गेली आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला जात आहे. मी केवळ पोलिसांनी दिलेली माहिती माध्यमांसमोर मांडली होती. विरोधक या घटनेचे राजकारण करत आहेत, हे दुर्दैवी आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची वाणी, मिळणार विदर्भाच्या घशाला पाणी
कठोर कारवाईचे आश्वासन
गृह राज्यमंत्री कदम यांनी या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. भारताचा नवीन बीएनएस कायदा लागू झाला आहे. त्या कायद्यातील कठोर कलमे लावून आरोपीला शिक्षा मिळेल. आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच येत नाही,” असे योगेश कदम यांनी ठामपणे सांगितले.
स्वारगेट परिसरात इतक्या गर्दीच्या ठिकाणी असा प्रकार घडतो आणि कोणी मदतीसाठी पुढे का आले नाही, हा सवालही योगेश कदम यांनी उपस्थित केला. रहदारीच्या ठिकाणी आमच्या बहिणीवर अत्याचार होत असताना कोणीही मदतीला पुढे का आला नाही? समाजानेही यावर विचार करायला हवे, असे कदम म्हणाले.
विरोधकांचा राजकारणासाठी मुद्दा?
या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप मंत्री कदम यांनी केला. महिलांवरील अत्याचारासारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करणे चुकीचे आहे. सरकार आरोपींवर कठोर कारवाई करणार आहे आणि पीडितेला न्याय मिळवून देणार आहे, असेही कदम यांनी ठणकावले.
स्वारगेट घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. सरकार आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभे राहत असतानाच विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले आहे. मात्र, मंत्री योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट करत विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई होते का आणि पीडितेला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. समाज म्हणून आपण महिलांच्या सुरक्षेसाठी किती जागरूक आहोत, हा प्रश्न अनुत्तरितच आहे