
पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीदरम्यान अजित पवार आणि शरद पवार यांची नजरानजर झाली. या क्षणाचा सायलेंट क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
राजकारण म्हणजे नाती जपण्याचा खेळ, पण जेव्हा सत्तेच्या पटावर प्याद्यांची फेरमांडणी होते, तेव्हा नातीही तितकीच नाजूक होऊन जातात. कधी एकसंध असलेलं कुटुंब, जिथे सगळे एकत्र बसत, निर्णय घेत, आज दोन वेगळ्या दिशांना पाहतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या फाटाफुटीने केवळ पक्षच नाही, तर एका राजकीय कुटुंबातील संबंधांवरही खोल परिणाम केले. एक गट शरद पवारांचा, तर दुसरा अजित पवारांचा. महाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्याच्या या दोन नावांभोवतीच सध्या राजकीय चर्चेचं वादळ घोंगावत आहे. एका मंचावर येणं तर दूर, एकमेकांसोबत नजरानजर होण्याचंही या दोन्ही नेत्यांनी आतापर्यंत टाळलं. मात्र, पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या एका बैठकीत अचानक नजरानजर झाली, आणि अवघ्या काही सेकंदांनी चर्चेला नवा विषय मिळाला.
‘मोहब्बत हो या सियासत, जब जुबां खामोश हो जाती है, तो आँखें ही सारी बात कह देती हैं,’ असंच काहीस चित्र सध्या रंगलं आहे. पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये दर महिन्याला नियामक मंडळाची बैठक पार पडते. मात्र, यावेळी या बैठकीत केवळ ऊस उद्योग किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेत नव्हते. चर्चेत होता तो एक क्षण, एक नजर, जी संपूर्ण राजकीय वर्तुळात हलचल माजवून गेली. कारण हा क्षण होता शरद पवार आणि अजित पवार यांच्या नजरेला नजर भिडण्याचा. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या फाटाफुटीनंतर या दोन नेत्यांना एकाच मंचावर पाहण्याचे प्रसंग फारच क्वचित येतात. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये दोघांच्या गटात नेहमीच राजकीय टशन दिसून आले.

Praful Patel : नागपूर-गोंदिया एक्सप्रेसवे स्वप्नातून रस्त्यावर येण्यास सज्ज
बंद दाराआड चर्चा
बैठकीच्या दिवशी सकाळी सव्वाआठच्या सुमारास अजित पवार पोहोचले. त्यांनी तिथे उपस्थित लोकांची निवेदनं स्वीकारली, कार्यकर्त्यांशी गप्पा मारल्या. त्याचवेळी शरद पवार गटाचे जयंत पाटीलही तिथे आल्याचं अजित पवारांना कळलं. मग अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराआड बरीच चर्चा झाली, पण त्यात नेमकं काय बोलणं झालं, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. मग सकाळी 9:40 वाजता शरद पवार यांचं आगमन झालं. त्यांचं स्वागत दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील आणि दिलीप देशमुख यांनी केलं. शरद पवारांनी वळसे पाटलांकडे पाहत विचारलं, ‘लवकर आलात का?’ त्यावर वळसे पाटील म्हणाले, ‘हो साहेब.’
शरद पवार यानंतर वळसे पाटलांसोबत पुढे चालत गेले. तेव्हा अजित पवार उपाध्यक्षाच्या केबिनमध्ये कोणाशी तरी बोलत बसले होते. ते केबिन जवळ येताच वळसे पाटलांनी अचानक दरवाजा उघडला. त्या क्षणी अजित पवार आत दिसले, आणि शरद पवारांनी काही सेकंद त्यांच्याकडे पाहिलं. हा नजरानजरचा तो लख्ख क्षण कॅमेऱ्यात टिपला गेला. शरद पवार मग पुढे निघून गेले, पण त्या काही सेकंदांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला.
दोन्ही गट एकत्र
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फाटाफुटीनंतर दोघांचे संबंध नेहमी चर्चेचा विषय राहिले आहेत. फूट पडल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हीच ती जागा राहिलीये, जिथे दोन्ही गटांचे नेते एकत्र दिसतात. निवडणूक काळात त्यांच्या राजकीय टशनची चर्चा झाली, पण पुण्यातील या भेटीत शब्द नव्हते, संवाद नव्हता, फक्त नजरा भिडल्या.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या राजकीय संबंधात कितीही अंतर पडलं असलं, तरी त्या काही सेकंदांच्या नजरेच्या खेळाने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत.