विद्यार्थ्यांना दहशतवादी संबोधल्याचा आरोप करत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करत जाहीर माफीची मागणी केली आहे.
CJP Protest : नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणामुळे देशभरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेल्या कथित वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे.
काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेत सदाभाऊ खोत यांच्यावर कठोर शब्दांत टीका करत विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणणे हा लोकशाही मूल्यांचा अपमान असल्याचे म्हटले. त्यांनी सदाभाऊ खोत यांना ‘सदाभाऊ’ऐवजी ‘गुंडाभाऊ’ अशी उपमा देत विद्यार्थ्यांची बिनशर्त जाहीर माफी मागण्याची मागणी केली. शिक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची टीका करणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला.
सडकून टीका
अतुल लोंढे यांनी पुढे बोलताना, सदाभाऊ खोत यांचा पूर्वीचा संघर्षशील चेहरा आणि आताची भूमिका यामध्ये मोठा फरक असल्याचे सांगितले. शेतकरी, गरीब आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे सदाभाऊ खोत आता सत्तेच्या जवळ जाण्यासाठी विद्यार्थ्यांविरोधात भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे समर्थन करताना आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुंड किंवा दहशतवादी ठरवणे हे अत्यंत निषेधार्ह असल्याचे त्यांनी म्हटले.
विद्यार्थ्यांवर होणाऱ्या कारवाईचे समर्थन करून मंत्रिपद मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. शिक्षण, रोजगार आणि न्यायाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांचा अवमान करणारे कोणतेही वक्तव्य स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट करत लोंढे यांनी सदाभाऊ खोत यांनी देशातील विद्यार्थ्यांची जाहीर आणि बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी पुन्हा एकदा केली. या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले असून यावर पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
