नागपूरमधील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलीस आयुक्तांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश दिले असून, आमदार डॉ. परिणय फुके यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
DPC Meeting : सकाळी कामावर जाण्याची घाई, शाळेत पोहोचण्याची धडपड, रुग्णालयात वेळेत पोहोचण्याची धास्ती… आणि या सगळ्यावर मात करत नागपूरकरांना रोज तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागत आहे. अनेकदा सायरन वाजवत धावणाऱ्या रुग्णवाहिकाही वाहनांच्या लांबलचक रांगांमध्ये थांबतात. त्या काही क्षणांचा विलंब एखाद्या रुग्णासाठी जीवन-मरणाचा प्रश्न ठरू शकतो. हीच सामान्य नागरिकांची वेदना विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी जिल्हा नियोजन व विकास समिती (डीपीडीसी) बैठकीत अत्यंत ठामपणे मांडली.
शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे केवळ वेळ आणि इंधनाचा अपव्यय होत नाही, तर नागरिकांचे मानसिक आरोग्य, दैनंदिन जीवन आणि आपत्कालीन सेवांची कार्यक्षमताही गंभीरपणे प्रभावित होत असल्याकडे त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन वाहनांना वेळेत मार्ग मिळत नसल्याने अनेकांचे जीव धोक्यात येत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नागरिकांना दिलासा
डॉ. परिणय फुके यांनी मांडलेल्या या गंभीर वास्तवाची दखल घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यानंतर डॉ. फुके यांनी पोलीस आयुक्तांना स्वतंत्र निवेदन देत वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी ठोस उपाय सुचविले.
प्रमुख चौकांचे रुंदीकरण, आवश्यक ठिकाणी ग्रेड सेपरेटर उभारणे, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करणे, वाहतुकीच्या घनतेनुसार सिग्नलचे नियोजन करणे तसेच अतिक्रमण आणि बेकायदा पार्किंगविरोधात संयुक्त मोहीम राबविण्याची मागणी त्यांनी केली.
Parinay Fuke : विरोधकांचे गैरसमज विरले, दादांचे मुद्दे निर्णायक ठरले!
पार्किंग गरजेची
वर्धा रोड, सेंट्रल अॅव्हेन्यू, अमरावती रोड, हिंगणा रोड, बेसा–मनीष नगर मार्ग, कामठी रोड, ग्रेट नाग रोड, उमरेड रोड, इनर रिंग रोडवरील प्रमुख चौक आणि मिहान–विमानतळ मार्ग या सतत वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या भागांमध्ये प्राधान्याने उपाययोजना करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यासोबतच व्यावसायिक भागांमध्ये पुरेशा पार्किंग सुविधा उभारणे, रस्त्यांवरील बेकायदा पार्किंग रोखणे आणि वाढत्या वाहतूक ताणाचा विचार करून ट्रॅफिक वॉर्डनची संख्या वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.
“रोजच्या वाहतूक कोंडीत अडकलेला प्रत्येक नागपूरकर हा फक्त वेळ गमावत नाही, तर अनेकदा आशा, संयम आणि सुरक्षिततेची भावना देखील हरवत असतो,” असा संदेश या चर्चेतून अधोरेखित झाला. नागपूरची वाहतूक व्यवस्था अधिक सुरक्षित, गतिमान आणि नागरिकाभिमुख व्हावी, यासाठी प्रशासनाने तातडीने समन्वयाने काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ. परिणय फुके यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला. पालकमंत्र्यांच्या निर्देशांनंतर आता नागपूरकरांच्या नजरा प्रशासनाच्या पुढील कृतीकडे लागल्या आहेत.
