
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने सरकारने नुकसानग्रस्तांना 7 लाख 20 हजारांची मदत जाहीर केली आहे.
नागपूरमध्ये उसळलेल्या दंगलीने शहराला हादरवून सोडले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली, अनेक दुकाने जाळली गेली आणि वाहनांची नासधूस झाली. कुटुंबांनी आपले जवळचे लोक गमावले, तर काहींना मोठ्या संकटांचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर आता सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, नुकसानीचा पंचनामा पूर्ण झालेला आहे. नुकसानग्रस्त कुटुंबीय आणि दुकानदारांना मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
नागपूर हिंसाचार आणि दगडफेकीमुळे लाखोंचे नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईसाठी सरकारी नियमांनुसार नुकसानग्रस्तांना 7 लाख 20 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुढील दोन दिवसांत ही मदत मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांसाठी 5 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठवला आहे.

Nagpur : प्रशासकीय गतिमानता पुरस्कारांत नागपूर विभागाचे वर्चस्व
राजकारणही तापलं
दंगलीत 61 वाहनांचे नुकसान झाले आहे. सोबतच एकाचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे नागपूरमध्ये आठवडाभर संचारबंदी लागू करण्यात आली होती. विधानसभेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनातही मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत राहिला. या हल्ल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका करायला देखील सुरुवात केली.
दंगलीचा फटका केवळ स्थानिक नागरिकांनाच नाही तर राजकीय स्तरावरही जाणवला. नागपूर दंगलीवर टीव्ही डिबेटमध्ये भूमिका मांडणाऱ्या भाजप प्रवक्ते अजय पाठक यांना परदेशातून थेट जीवे मारण्याची धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पाठक यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. धमकी मागे कोणाचा हात आहे, हे शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
अनधिकृत बांधकाम
दंगलीत मुख्य आरोपी म्हणून फहीम खान याचे नाव पुढे आले आहे. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर आणखी एक प्रमुख आरोपी, युनूस अब्दुल हाफीज, याच्या इमारतीवर नागरी अधिकाऱ्यांनी कारवाई करत बांधकाम देखील पाडण्यात आले.
उपराजधानीत 17 मार्च रोजी झालेल्या दंगलीत जखमी झालेल्या इरफान अन्सारीचा पाच दिवसांनी मृत्यू झाला. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी संतोष गौर आणि दुसऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी हल्ल्याबाबत एफआयआर नोंदवला होता, मात्र इरफानच्या मृत्यूनंतर आता हत्येचा आरोप देखील जोडण्यात आला आहे.