महाराष्ट्र

Akola : वीज ग्राहकांकडून थकबाकी वसूल करणार दामिनी पथक 

MSEDCL : महावितरणच्या महिला पथकाचा धडाका

Post View : 34

Author

वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांसाठी महावितरणचा ‘दामिनी पथक’ धडाक्यात उतरला आहे. थेट दारात जाऊन वसुली करण्याची मोहीम सुरू असून, थकबाकीदारांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागत आहे.

विजेचे बिल भरायला वारंवार टाळाटाळ करणाऱ्या मोठ्या थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महावितरणच्या ‘दामिनी पथका’ने थेट थकबाकीदारांच्या घरपोच जाऊन वीजबिल वसुलीची मोहीम सुरू केली आहे. आर्थिक वर्ष संपण्यास केवळ तीन दिवस उरले असताना परिमंडळात तब्बल 190 कोटी रुपयांची थकबाकी अजूनही बाकी आहे. ही वसुली करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची झटपट सुरू आहे.

थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने महावितरणने कठोर भूमिका घेतली आहे. ग्राहक घरात नसल्याचे कारण सांगून वसुली पथकाला टाळण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र ‘दामिनी पथक’ अशा ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत आहे. दहा हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांना दामिनी पथकाच्या रडारवर ठेवण्यात आले असून, थेट वीज मीटर जप्त करण्याची कारवाई केली जात आहे.

Chitra Wagh : वादग्रस्त निकालांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

मोहिम सुरू 

मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली, अधीक्षक अभियंते सुरेंद्र कटके (बुलढाणा), अजय शिंदे (वाशीम) आणि अजितपालसिंह दिनोरे यांच्या पुढाकाराने बुलढाणा, वाशीम आणि अकोला या तीन जिल्ह्यांत दामिनी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. प्रत्येक दामिनी पथकात अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, 10 महिला अभियंता आणि कर्मचारी यांचा समावेश आहे. त्याचबरोबर सुरक्षा रक्षक आणि वीज वितरण केंद्रातील तंत्रज्ञ हेही मदतीसाठी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक आणि इतर प्रकारच्या ग्राहकांकडून १९० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करायची आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातून 59 कोटी रुपये, बुलढाणा जिल्ह्यातून 98 कोटी रुपये, वाशीम जिल्ह्यातून 33 कोटी 67 लाख रुपये थकबाकी वसूल करणे बाकी आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठी धडपड करावी लागत आहे.

Nagpur : व्हॉट्सअॅपवरून आलेला मेसेज 21 लाखांना पडला महाग

वीजपुरवठा खंडित

महावितरणच्या सततच्या नोटीस आणि सूचना असूनही वीजबिल न भरणाऱ्या तब्बल आठ हजार 500 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात दोन हजार 494 ग्राहक, बुलढाणा जिल्ह्यात चार हजार 262 ग्राहक, वाशीम जिल्ह्यात एक हजार 744 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ग्राहकांना संपूर्ण थकीत बिलासह 310 रुपये पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पुन्हा सुरू केला जाणार नाही. त्यामुळे महावितरणच्या कारवाईत अडकू नये म्हणून ग्राहकांनी त्वरित वीजबिल भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या काही दिवसांत थकबाकीदारांकडून वीजबिल वसुलीसाठी महावितरणची यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली आहे. कोणत्याही प्रकारच्या तडजोडीशिवाय कठोर कारवाई केली जात आहे. महावितरणच्या ‘दामिनी पथका’च्या आक्रमक कारवाईमुळे थकबाकीदार ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अजूनही वीजबिल भरलेले नाही, त्यांनी महावितरणच्या कारवाईत अडकण्याआधीच आपली थकबाकी भरून सहकार्य करावे, अन्यथा कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!