महाराष्ट्र

Narendra Modi : नागपुरातील त्या 16 मिनिटांत भागवत म्हणाले..

Nagpur Visit Of PM : आरएसएस प्रमुख अन् नरेंद्र मोदी यांच्यात कोणती चर्चा?

Post View : 27

Author

Meeting With Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आता सुरू झाले आहे. शंभर वर्षांपासून अब्जावधी स्वयंसेवक घडवणाऱ्या संघाच्या मुख्यालयाला गुढीपाडव्याच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली. तिथीनुसार चैत्र प्रतिपदा हा डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस. या दिवशी संघ मुख्यालयातील स्मृतिमंदिरात नतमस्तक होत पंतप्रधानांनी संघ आणि भाजप यांचे नाते अतूट असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 16 ते 17 मिनिटांपर्यंत होते. यावेळी त्यांनी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मृतीला अभिवादन केले. त्यानंतर काही क्षण त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्याशी चर्चा केली. पंतप्रधान आणि संघप्रमुख यांच्या या चर्चेचा फोटो आणि व्हिडीओदेखील सर्वत्र व्हायरल झाला आहे. देशाचे प्रमुख आणि संघप्रमुख यांच्यामध्ये नेमका कोणता संवाद झाला, याची उत्सुकता यामुळे शिगेला पोहोचली आहे.

Narendra Modi : नागपूर येथील दौऱ्यात बदलली ‘बटेंगे तो कटेंगे’ची व्याख्या

काय सांगितलं भागवतांनी? 

नागपूर शहरांमध्ये असलेल्या महाल भागात कधी नव्हे ती जातीय दंगल झाली. हा संपूर्ण परिसर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अभेद्य गड म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये दंगल झाल्यामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे. महाल सारखी परिस्थिती देशातील अनेक भागांमध्ये निर्माण होऊ शकते. अशा विषयावर तर डॉ. मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष साजरा होत आहे. यासंदर्भातही भागवत आणि मोदी यांच्यात चर्चा झाली असू शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे मोदी यांच्या संघ भूमीतील भेटीत नेमकं काय घडलं? याबद्दल सर्वांनाच जाणून घ्यायचे होते.

‘द लोकहित लाईव्ह’ने यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी संघप्रमुख डॉ. मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली, हे काहीसा उलगडा होऊ शकला. रेशीम बागेतील कार्यालयात पंतप्रधान पोहोचल्यानंतर संघाचे वरिष्ठ पदाधिकारी भैय्याजी जोशी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येथे उपस्थित होते. स्मृतिस्थळाला अभिवादन केल्यानंतर मोदी आणि डॉ. भागवत यांच्यामध्ये अशा कोणत्याही गुप्त विषयावर चर्चा झाली नाही, असे सांगण्यात आले.

रेशीम बागेतील संघाच्या कार्यालयाचे स्वरूप पाहिल्यानंतर पंतप्रधान भारावले. स्मृती मंदिरातील परिसराबाबत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सध्याच्या कार्याबद्दल तेवढी दोन्ही प्रमुखांमध्ये चर्चा झाली. संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले की, संघाकडून कोणालाही काय करावे, हे सांगण्याची कधीही गरज पडत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सखोल विचारधारा आहे. त्यामुळे राष्ट्रहितासाठी काय करायचे आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगण्याची गरज संघप्रमुख डॉ. मोहन भागवत भासली नाही.

महोत्सवाची तयारी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यंदा शताब्दी वर्ष साजरे करत आहे. देशभरामध्ये यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरलेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये कधीही मतभेद नव्हते. आजही नाहीत. संघाचे कार्य स्वतंत्र स्वरूपाचे आहे. भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष आहे. मात्र दोघांचेही ध्येय राष्ट्रहित, हेच असल्याचे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले. रेशीम बागेतील संघ कार्यालयाला पंतप्रधानांनी दिलेल्या भेटीत आरएसएस प्रमुख यांच्याकडून अमूक सूचना केली गेली किंवा तमूक विषयाबाबत निर्देश दिले गेले, अशा चर्चा होत असतील, तर त्या निराधार आणि अपूर्ण माहितीवर आधारित असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

दोघेही अंतर राखून 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली, त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. भैय्याजी जोशी हे देखील पूर्ण वेळ सोबत होते. परंतु फडणवीस आणि गडकरी हे देखील डॉ. भागवत आणि मोदी यांच्यापासून अंतर राखूनच होते. ज्या ज्या क्षणी मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी एकत्र चर्चा करत होते, त्यावेळी दोघांचे अंगरक्षकही आसपास नव्हते. त्यामुळे एकांतात दोन्ही प्रमुखांमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे मोदी आणि भागवत यांनाच ठाऊक असल्याचेही, संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

प्रसन्न जकाते | Prasannaa Jakate

मातृभूमी (अकाेला), सकाळ (अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती), दैनिक भास्कर हिंदी (मराठवाडा वृत्त विभाग प्रमुख) , महाराट्र टाइम्स (नागपूर), भास्कर समूहाचे मराठी दैनिक दिव्य मराठी (अमरावती), सकाळ माध्यम समूहाचे पॉलिटिकल वेब पोर्टल सरकारनामा असा प्रसन्न यांचा पत्रकारितेचा सुमारे 26 वर्षांचा प्रवास आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या हस्ते प्रसन्न यांचा शोध प्रबंध भुवनेश्वर येथील भारतीय विज्ञान मेळाव्यात प्रकाशित करण्यात आला. क्राइम रिपोर्टिंग पासून आपल्या पत्रकारितेचा प्रवास सुरू करणाऱ्या प्रसन्न यांनी गडचिरोली, छत्तीसगडमधील बक्स, अबुजमाड या नक्षलवाद्यांची भीषण दहशत असलेल्या भागात ग्राऊंड रिपोर्टिंग केले आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश येथील अनेक निवडणुकीचे रिपोर्टिंगही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रातून स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट (सिमी) आणि दिनदार-ए-अंजुमन या दोन प्रतिबंधित संघटनांचे नेटवर्क उद्ध््वस्त करणारे रिपोर्टिंगही त्यांनी केले. मुंबई हल्ल्यातील दहशतवादी याकुब मेमन याच्या फाशीच्या घटनेचे ‘ऑन द स्पॉट’ आणि कुठेही न प्रकाशित झालेले वार्तांकनही त्यांनी नागपूर येथे केले.

More Posts

Follow Me:Add me on XAdd me on Facebook

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!