
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर दौऱ्यात दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माधव नेत्रालयाचे भूमिपूजन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात दाखल झालेआहे. त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. नागपुरातील रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात पंतप्रधानांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी थेट दीक्षाभूमी गाठून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या स्मृतीस वंदन केले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दोन महत्त्वाच्या शक्तिकेंद्रांना अभिवादन करत आपल्या श्रद्धा व्यक्त केल्या. दीक्षाभूमीच्या भेटीला आठ वर्षांनी पंतप्रधान उपस्थित राहिले, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठिकाणी तब्बल दहा वर्षांनंतर त्यांची उपस्थिती नोंदवली गेली. 12 ते 13 मिनिटे मोदी हे दीक्षाभूमीत होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान मोदी माधव नेत्रालयाचे भूमिपूजन करणार आहेत. दीक्षाभूमीत त्यांनी प्रमुख भंतेंसह आंबेडकर आणि गौतम बुद्धांना अभिवादन केले आहे. नागपुरातील हा महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्प लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. मोदींच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. या सोहळ्याला अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने एक ऐतिहासिक क्षण घडणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक वर्षांनी एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत. यामुळे या दौऱ्याला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

मराठीशी नाळ
पंतप्रधान मोदींनी याआधी एका साहित्य संमेलनात भाषण करताना सांगितले होते की, त्यांचा मराठीशी जुना आणि जिव्हाळ्याचा संबंध आहे. त्यांनी हेडगेवार आणि मोहन भागवत यांचा विशेष उल्लेख करत, मराठीतच आपली भावना व्यक्त केली होती. त्यांचा मराठी भाषेशी असलेला हा भावनिक नाता नागपूरच्या या दौऱ्यात पुन्हा एकदा अधोरेखित झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी नऊ वाजता नागपूर विमानतळावर दाखल झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेणार आहे.
‘पूजनीय डॉक्टर हेडगेवार जी आणि पूज्य गुरुजी यांना शतशः नमन. त्यांच्या स्मृतींना जपताना, या स्मृती मंदिरात येऊन भारावून जातो. भारतीय संस्कृती, राष्ट्रवाद आणि संघटन शक्तीच्या मूल्यांना समर्पित हे स्थान आम्हाला राष्ट्रसेवेसाठी प्रेरणा देते. संघाचे हे दोन मजबूत स्तंभ असलेल्या या स्थळी येऊन, देशसेवेला समर्पित लाखो स्वयंसेवकांसाठी ही ऊर्जा प्रदान करणारी पवित्र भूमी आहे.’ असं मोदींनी आपल्या अभिप्रायामध्ये लिहिले आहे.