गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने नव्या वादास तोंड फुटले आहे. इतिहास आणि संस्कृतीच्या चर्चेत राजकारणाची फोडणी पडल्याने राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
गुढीपाडव्याच्या सणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचा संदर्भ देत वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या आनंदोत्सवावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गुढी उभारण्याच्या भानगडीत आम्ही पडत नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्याने राज्यभरातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
गुढीपाडवा हा मराठी नववर्ष म्हणून साजरा केला जातो. मात्र, संभाजी महाराजांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवशी हा सण येतो, या मुद्द्यावर वडेट्टीवारांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर जोरदार आक्षेप घेतला आहे.
तापलेला वाद
विजय वडेट्टीवार यांच्या विधानानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवर सुरू असलेले वाद, नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली तणावपूर्ण परिस्थिती आणि कुणाल कामराच्या विधानावर झालेले वाद अजूनही शांत झालेले नाहीत. अशा स्थितीत वडेट्टीवार यांनी गुढीपाडव्याच्या सणावर बोलत नव्या वादास तोंड फोडले आहे.
विजय वडेट्टीवार यांच्या विधानावर टीका करणाऱ्यांचे म्हणणे आहे की, मराठी संस्कृतीचा आणि गुढीपाडव्याचा अवमान करण्याचा हा प्रकार आहे. असे विधान समाजात तेढ निर्माण करणारे आहे. तर, त्यांच्या समर्थकांनी या विधानाचे समर्थन करत त्यांना इतिहासाची जाणीव असल्याचे म्हटले आहे.
Sanjay Raut : पाठिंब्याच्या इंजिनवर शिवसेनेच्या प्रश्नांची मशाल
शुभेच्छांमुळे झालेले विरोधाभास
गुढीपाडव्याच्या सणावर वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी याच सणाच्या निमित्ताने जनतेला शुभेच्छा देऊन आणखी गोंधळ निर्माण केला. गुढी उभारू आनंदाची, आरोग्याची, समाधानाची आणि उत्तुंग यशाची,अशा शब्दांत त्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
आधीच्या विधानाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट विरोधाभासी वाटत असल्याने राजकीय चर्चेला नवा रंग चढला आहे. त्यांच्या या विधानाने काँग्रेसच्या अंतर्गत वर्तुळातही नाराजी पसरल्याचे समजते. काही नेत्यांनी या प्रकाराला वैयक्तिक मत म्हणून घोषित केले असले तरी विरोधी पक्षांनी याला काँग्रेसची अधिकृत भूमिका असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे.
