अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत अमरावती, बडनेरा आणि धामणगाव या विदर्भातील तीन रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण होणार आहे.
भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेचा सुवास आता विदर्भाच्या मातीपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांमध्ये अमरावती जिल्ह्यातील तीन प्रमुख स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या तीन गावांचे पूर्णतः आधुनिकीकरण होणार आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुखद, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या योजनेची माहिती देताना सांगितले की, देशातील रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे. विशेषतः विदर्भातील स्थानकांना याचा मोठा फायदा होतो आहे.
भंडारा जिल्ह्यातील भंडारा रोड आणि तुमसर रोड स्थानकांसाठी याआधीच निधी मंजूर करण्यात आला होता. आता अमरावती जिल्ह्यालाही या विकासाचा लाभ मिळतो आहे. बडनेरा रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण युद्धपातळीवर सुरू आहे. जुन्या आणि नव्या वस्तीला जोडणारा जुनाट पूल हटवून तिथे नव्या पुलाचे काम सुरू आहे. प्रवाशांसाठी एक नवा पादचारी पूल उभारण्यात आलेला आहे. एस्केलेटर्सही बसवण्यात आले आहेत. एकूण 36 कोटी 30 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला आहे. धामणगाव रेल्वे स्थानकालाही बदलाची झुळूक लागली आहे.
Education Department : विदर्भातील शिक्षण क्षेत्रात मोठी हालचाल
प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा
तब्बल 18 कोटींचा निधी येथे मंजूर झाला आहे. या रकमेतून प्रवाशांसाठी हाय क्वालिटी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या स्थानकांचे आधुनिकरण म्हणजे केवळ बांधकाम नव्हे, तर प्रवाशांच्या अनुभवाचा संपूर्ण कायापालट आहे. अमरावती रेल्वे स्थानकावर आधीच काही विकासकामे सुरू झाली आहेत. येथे वेटिंग लाउंज, स्वच्छतागृहे, फूड कोर्ट्स, डिजिटल टच पॅनेल्स, लिफ्ट्स आणि एस्केलेटर्स यांसारख्या सुविधा उभारल्या जाणार आहेत. स्थानकाचे सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे. त्याला शहराशी अधिक चांगल्या प्रकारे जोडले जाणार आहे.
आधुनिकीकरणामुळे स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे. या तिन्ही स्थानकांचे आधुनिकीकरण हे केवळ भौतिक बदल नाही, तर प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासात सकारात्मक बदल घडवणारे आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व प्रवाशांसाठी ही सुधारणा उपयोगी ठरणार आहे. या प्रकल्पामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाम पाठपुरावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य आहे. महाराष्ट्रातील रेल्वे विकासाला केंद्र सरकारचा चांगलाच हातभार लाभतो आहे.
Praful Patel : राष्ट्रवादीच्या विचारधारेला भंडाऱ्यात मोठा प्रतिसाद
अमरावतीसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्याला प्राधान्य देत, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. या आधुनिकीकरणामुळे अमरावती जिल्हा आणि विदर्भाचा विकास अधिक गतीमान होणार आहे. रेल्वे स्थानके ही केवळ प्रवासाची ठिकाणे नसून, शहराच्या ओळखीचा भाग असतात. आता ती ओळख अधिक भव्य आणि आधुनिक होणार आहे.
