नागपुरातील कलाक्षेत्रातून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कलाकारांनी वडेट्टीवार यांच्या मंगेशकर कुटुंबावरील टीकेला कडाडून विरोध केला आहे.
नागपूरच्या सांस्कृतिक व कलात्मक वर्तुळात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात तीव्र असंतोषाची लाट उसळली आहे. सुप्रसिद्ध गायक, वादक आणि कलासाधकांनी एकत्र येत वडेट्टीवार यांच्या वादग्रस्त विधानांचा खरपूस समाचार घेतला आहे. लता मंगेशकर यांच्यासारख्या राष्ट्रभक्त गायिकेवर सार्वजनिक टीका करणे ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेवर घाव असल्याचे कलाकारांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे कलाक्षेत्रात निर्माण झालेली खळबळ ही राजकीय हेतूंनी प्रेरित आहे. स्वतःच्या अस्तित्वासाठी वडेट्टीवार हे जनभावनांशी खेळ करत असल्याची टीका मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यांची ही कृती म्हणजे एका संपूर्ण संगीत परंपरेच्या विरोधात उभे राहण्याचा प्रयत्न असल्याचे अनेक कलावंतांनी स्पष्ट केले.
राजकीय अस्तित्व धोक्यात
भाजपचे आमदार संदीप जोशी, ज्येष्ठ गायक अमित खोब्रागडे, तबलावादक सचिन ढोमणे आणि रंगभूमीवरील प्रख्यात व्यक्तिमत्त्व प्रफुल्ल माटेगावकर यांनी एकत्र येत वडेट्टीवारांच्या विधानावर कडाडून टीका केली आहे. त्यांनी सार्वजनिकपणे जाहीर केलं की, हे विधान केवळ चुकीचे नाही, तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मूल्यांची विटंबना करणारे आहे. कलाकारांनी असा ठाम दावा केला की, वडेट्टीवार यांच्या मनात जनतेबद्दल आणि सांस्कृतिक परंपरेबद्दल जराही आदर शिल्लक राहिलेला नाही.
लता मंगेशकर यांनी 1963 मध्ये दिल्लीच्या नॅशनल स्टेडियमवर ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत गाताच पंडित नेहरूंच्या डोळ्यांत अश्रू आले होते, हा प्रसंग भारतीय इतिहासात अमर आहे. त्या गाण्याच्या राष्ट्रप्रेमात्मक प्रभावाला कमी लेखण्याचा प्रयत्न करणे हे राष्ट्रद्रोहासारखे असल्याचे कलाकारांचे मत आहे.
वक्तव्यामागे हतबलता
कलाविश्वातील असंतोष वडेट्टीवार यांच्या राजकीय नैराश्याचे प्रतिबिंब असल्याचे देखील बोलले जात आहे. कलाकारांनी आरोप केला की, वडेट्टीवार यांनी आपल्या पक्षातील स्थान वाचवण्यासाठी आणि जनतेच्या लक्षात राहण्यासाठी मुद्दामून वादग्रस्त विधान केले. पण हे विधान त्यांच्याच राजकीय अधःपतनाला कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कलाकारांनी वडेट्टीवारांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या जमिनीबाबत तथ्य तपासून बोलण्याचे आव्हान दिले आहे. तसेच मंगेशकर कुटुंबाच्या देशसेवेच्या वारशाविषयी अज्ञान पसरवण्याऐवजी, स्वतःच्या आणि पक्षाच्या आर्थिक व्यवहारांची माहिती जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
