
नागपूर खंडपीठाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 2024 विधानसभा निवडणुकीसंदर्भात नोटीस बजावली आहे.
महाराष्ट्रातील 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने मोठा विजय मिळवत सत्तेवर कब्जा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मोठ्या मतांनी विजय मिळवला. मात्र ही लढाई निकालावरच थांबली नाही. काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांनी आता हा विजय थेट न्यायालयात आव्हान केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की निवडणुकीमध्ये प्रक्रियात्मक त्रुटी आणि अप्रामाणिक मार्गांचा वापर झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने देवेंद्र फडणवीस यांना नोटीस बजावली आहे.
2024 मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात एक रोचक राजकीय लढत पाहायला मिळाली. एका बाजूला भाजपचे दिग्गज नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे. निवडणूक रंगली, प्रचार झडला आणि अखेर निकाल लागला. देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 39 हजार 710 मतांच्या फरकाने बाजी मारली. मात्र त्यांनी आता न्यायालयात याचिका दाखल करून निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे. कोर्टाने या मागणीची दाखल घेतली आहे.

विरोधकांचा आरोप कायम
फडणवीस यांना नोटीस 17 एप्रिल रोजी गुरुवारी पाठवण्यात आली. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या विजयावर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या 8 मे 2025 रोजी करणार आहे. या याचिकेच्या फेऱ्यात केवळ फडणवीस यांनाच बसलेला नाही. भाजपचे आणखी दोन आमदार देखील याचिकांच्या फेर्यात अडकले आहेत. नागपूर पश्चिम मतदारसंघाचे आमदार मोहन मते आणि चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कीर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनाही समन्स बजावण्यात आले आहेत.
भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी मिळवलेल्या या घवघवीत यशामध्ये फडणवीस यांचा विजय महत्त्वाचा मानला जातो. मात्र विरोधकांना हा विजय सहज पचलेला नाही, असं चित्र निर्माण झालं आहे. प्रफुल्ल गुडधे यांनी निवडणूक प्रक्रियेतील कथित त्रुटींवर बोट ठेवलं आहे. गुडधे यांच्या याचिकेत म्हटलं आहे की, निवडणुकीदरम्यान अनेक नियम पायदळी तुडवले गेले. प्रचारादरम्यान बेकायदेशीर साधनांचा वापर, निवडणूक खर्चात गडबड आणि मतदारांना आकर्षित करण्यासाठी वापरलेले संशयास्पद मार्ग यांचा तपशील त्यांनी न्यायालयापुढे सादर केला आहे.