
भंडारा जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात पिण्याचे पाणी, स्वच्छता आणि इतर समस्यांचा गंभीर त्रास विद्यार्थ्यांना होऊ लागला आहे. या समस्यांवर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रशासनावर जोरदार टीका करत तीव्र संताप व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानानं उच्चांक गाठला आहे. चटके लावणाऱ्या उन्हानं सर्वत्र पाणी टंचाई आणि विजेचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, सरकारी शाळा, आश्रमशाळा आणि वसतिगृहांतील समस्या अद्यापही कायमच आहे. भंडारा जिल्ह्यातील पाचगाव येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थी पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येला तोंड देत आहेत. पाणी आणि स्वच्छतेच्या अभावामुळे त्यांना आरोग्य विषयक त्रास वाढत आहेत. 20 एप्रिल 2025 रोजी, भंडारा-गोंदियाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी नवोदय विद्यालयाला धडक दिली.
खासदार डॉ. पडोळे यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यावेळी बरीच धक्कादायक माहिती समोर आली. गेल्या 15 दिवसांपासून शाळेत पिण्याचे पाणीच उपलब्ध नाही. त्याचप्रमाणे, स्वच्छता आणि शौचालयांच्या अस्वच्छतेमुळे विद्यार्थ्यांना गंभीर आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. विशेष म्हणजे, काही पालकांनी आपल्या मुलांना घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थ्यांची गैरसोय होणे अत्यंत दु:खद आहे, असा संताप खासदार डॉ. पडोळे यांनी व्यक्त केला.

प्राचार्यांची निष्क्रियता
अव्यवस्थेच्या विळख्यात असलेल्या शाळेच्या व्यवस्थापनावर खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी कडक शब्दात टीका केली. सात वर्षांपासून शाळा सुरू आहे. तरीही पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था का झाली नाही? असा सवाल त्यांनी केला. डॉ. पडोळे म्हणाले की, शाळेतील प्राचार्यांच्या निष्क्रियतेमुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्या सहन कराव्या लागत आहेत. प्राचार्यांच्या स्वभावामुळं विद्यार्थ्यांना आपली दुःखद कहाणी बोलण्याची संधी देखील मिळत नाही. नवोदय विद्यालयाच्या शाळेतील स्वच्छतेची अवस्था चिंताजनक असल्याचेही खासदार डॉ. पडोळे यांनी यावेळी सांगितले.
शाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही पगार कमी आहे. अनेकांजवळ ओळखपत्रांचा अभाव आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण आहे. विविध समस्यांच्या सापळ्यात नवोदय विद्यालय अडकले आहे. त्यामुळं परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. यासंदर्भात तत्काळ कारवाई करावी लागेल, असा इशारा डॉ. पडोळे यांनी कंत्राटदार आणि प्राचार्यांना दिला. डॉ. पडोळे यांनी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ शाळेतील पाणी, स्वच्छता आणि इतर सुविधा पुरवण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राचार्यांच्या दबावाखाली लपलेली माहिती बाहेर येण्यास प्रशासनाच्या कार्यवाहीची आवश्यकता आहे, असे ते म्हणाले.
Parinay Fuke : जलसंपत्तीच्या संवर्धनासाठी आमदाराचे क्रांतिकारी पाऊल
आंदोलनाचा इशारा
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी पालकांना आवाहन केले की, शाळेच्या अव्यवस्थेवर जनआंदोलन करण्याचा विचार करावा. प्रशासन नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत राहिलं, तर हे सहन करणं योग्य ठरणार नाही. आश्चर्याची बाब अशी की, एक प्रतिष्ठित शाळेची ही परिस्थिती पाहून स्थानिक पालकांमध्ये रोष आहे. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ करण्यात येत आहे. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असंही डॉ. पडोळे म्हणाले. यासंदर्भात आपण लवकरच भूमिका ठरविणार असल्याचंही डॉ. पडोळे यांनी स्पष्ट केलं.
Abhijit Wanjarri : आमदार निधीतून कर्तव्यपूर्ती उपक्रमाचा गावागावात ज्ञानप्रकाश