नागपूरच्या कडक उन्हात तापलेल्या परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांची सहनशक्तीची कसोटी लागली आहे. पंख्यांची अकार्यक्षमता आणि कूलरचा अभाव यामुळे ज्ञानयज्ञ उष्णतेच्या कोंडमाऱ्यात अडकला आहे.
शहराच्या तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा केंद्रांतील असह्य उकाड्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक दमछाक सुरू आहे. कूलर तर दूरच, पण कार्यरत पंखेही नसल्याने उष्णतेत बसून पेपर लिहिणे म्हणजे अत्याचारासारखे वाटत असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
मंगळवारी शहरातील काही प्रमुख परीक्षा केंद्रांची पाहणी केल्यावर हे गंभीर वास्तव समोर आले. अनेक ठिकाणी विद्यापीठाने कूलर भाड्याने घेण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही एकही केंद्रावर कूलर दिसून आला नाही. काही ठिकाणी पंखे बंद स्थितीत होते. तर काही ठिकाणी अत्यंत मंद गतीने फिरत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना उकाड्यात गुदमरल्यासारखी स्थिती जाणवत होती.
Maharashtra : महाज्योतीच्या उजळत्या ज्ञानदीपकांची यूपीएससीवर मोहोर
उष्णतेचा सामना
विद्यार्थ्यांनी सांगितले की, परीक्षा केंद्रांमध्ये बसल्यानंतरही गारवा नाहीच. पंखे फक्त फिरत आहेत, पण त्यांचा काही उपयोग होत नाही. काही वर्गांमध्ये खिडक्याही पूर्णपणे बंद असल्याने दमट हवा अडकून बसली. संपूर्ण वातावरण गुदमरवणारे बनले आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवातून या परीक्षेला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारे सत्र असे संबोधले.
काही परीक्षा हॉलमध्ये संपूर्ण वर्गासाठी केवळ दोनच पंखे असल्याचे दिसून आले. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना उष्णतेचा अधिक सामना करावा लागत होता. तासाभराच्याच आत घामाच्या धारा लागणाऱ्या या स्थितीत अनेक विद्यार्थ्यांची एकाग्रता ढासळत होती. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी रूममध्ये असह्य गारठ्यामुळे मधेच पाण्याचे वाटप, चेहऱ्यावर पाणी मारणे अशा उपायांनी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला.
विद्यापीठ प्रशासनाचे दुर्लक्ष
विद्यापीठाने उन्हाळ्याच्या परीक्षांसाठी कूलर भाड्याने घेण्यासाठी निधी मंजूर केल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा केंद्रांवर कूलर पोहोचलेले नाहीत. हिटवेव्हच्या पार्श्वभूमीवरही विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्याची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याचे स्पष्ट होते.
सध्याच्या उष्णतेच्या लाटेने नागपूरकरांचे जीवन अस्वस्थ झाले आहे. त्यातच परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्रास द्विगुणित झाला आहे. उष्णतेचा परिणाम केवळ शरीरावर नाही, तर विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील कामगिरीवरही होऊ शकतो. त्यामुळे पायाभूत सुविधा पुरविणे ही प्रशासनाची जबाबदारी ठरते.
विद्यार्थ्यांच्या या गंभीर अवस्थेवर त्वरित कारवाई व्हावी, अशी मागणी विविध स्तरातून होऊ लागली आहे. प्रशासनाने वेळ न घालवता परीक्षा केंद्रांमध्ये आवश्यक सुविधा पोहोचवाव्यात, हीच सध्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची अपेक्षा आहे.
