विकासाच्या नवदिशेचा आराखडा आखत वाशीम जिल्ह्यासाठी 315 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. शेती, जलसंपदा, शाश्वत सिंचन आणि ग्रामीण-शहरी समतोल विकासावर भर देत नियोजन बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
गुणवत्तेचा ठसा आणि निधीचा योग्य वापर हीच खरी प्रगतीची गुरुकिल्ली आहे, असे ठाम मत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी व्यक्त केला. वाशीम जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला नवा वेग देण्याचा निर्धार व्यक्त केला. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात 2025 – 26 आर्थिक वर्षासाठी 315 कोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी निधी मंजूर करत, जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागांना समतोल न्याय मिळावा यावर भर देण्यात आला.
वाशिम जिल्हा हा राज्याच्या मध्यवर्ती भागात आहे. परंतु आजही विविध अंगाने विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. औद्योगिक गुंतवणुकीचा अभाव, अपूर्ण सिंचन प्रकल्प, बेरोजगारीची वाढती तीव्रता आणि शिक्षण-स्वास्थ्य सुविधा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे जिल्ह्याला मागासतेचे ओझे वाहावे लागत आहे. नैसर्गिक साधनसंपत्ती असूनही योग्य नियोजनाच्या अभावामुळे त्या संधी हातचं गेल्याचे चित्र दिसते.
ग्रामीण भागातील शेतकरी आजही अवकाळी पावसाने, कर्जाच्या विळख्याने आणि बाजारपेठेच्या अभावाने त्रस्त आहे. त्यामुळे वाशिमसाठी केवळ आर्थिक निधी नव्हे, तर एक दूरदृष्टी असलेले, समन्वयित आणि लोकाभिमुख नियोजन हे काळाची गरज ठरत आहे. मात्र पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे नेतृत्वात झालेल्या बैठकीनंतर नवी दिशा निर्माण झाली आहे.
नवदृष्टी धोरण
महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्याच्या शेती, जलस्रोत, तीर्थक्षेत्रांचे विकास, तसेच पाणीटंचाईसारख्या ज्वलंत विषयांवर सखोल चर्चा झाली. यंत्रणांनी साचलेल्या पद्धतींना झटकून नव्या दृष्टीकोनातून काम करायला हवे, असे सांगत पालकमंत्र्यांनी त्रयस्थ शासकीय यंत्रणेमार्फत कामाच्या गुणवत्तेची चाचणी घेण्याचा निर्णय जाहीर केला.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या नियोजनाचे कौतुक करत पालकमंत्री भरणे यांनी शेतीसाठी सेंद्रिय पद्धती, आंतरपीक नियोजन, प्रक्रिया उद्योग आणि शाश्वत सिंचनावर भर देण्याचे संकेत दिले. फक्त उत्पादन नव्हे, तर बाजारपेठही निर्माण झाली पाहिजे, असे स्पष्ट करत त्यांनी घरगुती बियाणे, खत साठा, हवामान आधारीत पीक पद्धती यासारख्या मुद्द्यांवर कार्यवाहीची मागणी केली.
Nana Patole : इंदिरा गांधी असत्या, तर पाकिस्तानचे चार तुकडे झाले असते
पाणीटंचाईवर चर्चा
वाशीम जिल्ह्याला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचा मुद्दा अग्रक्रमाने पालकमंत्री यांनी मांडला. प्रशासनाला जलस्रोतांचे शास्त्रीय व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले. धरणे कोरडी झाली तरी उपाय योजना कोरड्या राहता कामा नये, अशा शब्दांत भरणे यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीला खासदार संजय देशमुख, भावना गवळी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. उपस्थित सर्व यंत्रणांनी आपापल्या आघाड्यांवरील कामांचा आढावा सादर करत सहकार्याची ग्वाही दिली.
विकास ही एक घटना नाही, ती एक प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया लोकसहभागातूनच फळाला येते, असे सांगत पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी वाशीम जिल्ह्याच्या विकासाची नवीन पायवाट उभी केली आहे. ही बैठक म्हणजे केवळ निधी वाटपाची नव्हे, तर भविष्यासाठी उभारलेल्या नव्या स्वप्नांची पायाभरणी होती. वाशीम जिल्ह्यातील जनतेसाठी ही एक आश्वासक सुरुवात आहे. प्रत्येक घटकापर्यंत विकासाचा झरा पोहोचवण्याचा मंत्र या बैठकीतून प्रतिध्वनित झाला.
