
खामला मार्केट हटवून त्या जागी लंडन स्ट्रीट प्रकल्प उभारण्याचा महापालिकेचा निर्णय नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारा ठरला आहे. बाजाराच्या हटवणीमुळे पर्यावरण हानी आणि स्थानिकांचा रोजगार धोक्यात आला आहे.
नागपूर महानगरपालिकेने घेतलेल्या एका वादग्रस्त निर्णयामुळे खामला परिसर पुन्हा चर्चेत आला आहे. अनेक वर्षांपासून नागरिकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणारे आणि स्थानिक संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेले बहुपरिचित खामला मार्केट हटवण्यात आले आहे. या मार्केटच्या जागेवर आता लंडन स्ट्रीट प्रकल्प राबवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही जागा मनपाने एका नामवंत खाजगी बिल्डरला विकल्याचे स्पष्ट झाले आहे.
खामला मार्केट हटवण्याच्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. नागपूरच्या नकाशावर प्रगतीचा नवा ठसा उमटवण्यासाठी हिरवळीचा बळी दिला जातो आहे, अशी भावना जनमानसात निर्माण झाली आहे. दैनंदिन गरजांची पूर्तता करणारे बाजारपेठ हटवून, त्या ठिकाणी भव्य प्रकल्प उभारण्याच्या प्रक्रियेवर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Vinod Agrawal : गावाकडून गगनाकडे, धावपट्टीवर प्रगतीचा मृदगंध
सौंदर्यीकरणाचे ढोंग
खामला मार्केट हे सहकार नगर, सोनगाव, जयप्रकाश नगर आणि खामला परिसरातील हजारो नागरिकांसाठी जीवनाचा अविभाज्य भाग होते. या बाजारात भाजीपाला, फळं, अंडी, मटण, कोंबडी यासारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तू सहज उपलब्ध होत्या. स्थानिक विक्रेत्यांसाठीही हे उत्पन्नाचे मुख्य साधन होते. पण महानगरपालिकेच्या एका आदेशाने या बाजाराचे अस्तित्वच नष्ट झाले.
वास्तविक नागपूर महानगरपालिका शहराच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली अनेक ठिकाणी काँक्रीटीकरण करत आहे. फुटाळा तलावातील सिमेंट शॉवर, झाडं तोडून उभ्या केलेल्या चौपाट्या आणि आता लंडन स्ट्रीट प्रकल्प, या सगळ्यामुळे शहरातील पारंपरिक ओळख आणि निसर्ग दोन्ही धोक्यात आले आहेत. लंडन स्ट्रीट प्रकल्पासाठी खामला परिसरातील शंभरहून अधिक प्रौढ झाडांची कत्तल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने पर्यावरणप्रेमी व सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण केली आहे.
Nitin Gadkari : शिर्डी महामार्गाच्या भूमिपूजनाला मला बोलवू नका
कत्तलीसाठी ग्रीन सिग्नल
नागपूरच्या वाढत्या तापमानात व पर्यावरणीय असमतोलात अशा निर्णयांचा मोठा वाटा असल्याचे कार्यकर्ते नमूद करत आहेत. मनपा वारंवार झाडे लावण्याचे आश्वासन देत असली, तरी वास्तवात झाडांच्या कत्तलीलाच मंजुरी देत आहे. हे सर्व सौंदर्यीकरणाच्या नावाखाली केले जात आहे. नागपूर शहर काँक्रीटच्या जंगलात बदलत आहे.खामला मार्केट हटवल्यानंतर त्या जागेचा विकास करण्याचे संपूर्ण नियंत्रण एका बिल्डरकडे दिले गेले आहे.
नागपूर महानगरपालिकेने याआधीही खामला परिसरातील दोनहून अधिक प्लॉट त्याच बिल्डरला विकले असल्याचे स्वतंत्र पत्रकार अंजया अनपार्थी यांनी स्पष्ट केले आहे. माहितीच्या अधिकाराअंतर्गत संबंधित कागदपत्रांची मागणी करूनही विक्रीची रक्कम, अटी वा प्रक्रिया समजलेली नाही. या प्रकल्पामुळे केवळ झाडांचाच नाही तर बाजारात विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचाही जीव अडचणीत टाकण्यात आला आहे. अनेक विक्रेते उपासमारीच्या स्थितीत पोहोचले आहेत.
हरित वारशावर धोका
नागपूर महानगरपालिका सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहरातील मूळ वैशिष्ट्येच नष्ट करत आहे. शहरातील नैसर्गिक संसाधने, ऐतिहासिक ठिकाणं आणि हरित पट्टे यांना बिल्डरच्या स्वार्थासाठी बळी देणे हा अघोषित अजेंडा बनला आहे.आज लंडन स्ट्रीट प्रकल्पामुळे खामला परिसरातील बाजार, झाडं, निसर्ग आणि संस्कृतीचा विनाश झाला आहे. हे केवळ एका बाजाराचे नसून, संपूर्ण नागपूर शहराच्या भविष्यासाठी गंभीर इशारा आहे.
पर्यावरण, गरज, आणि स्थानिकांची हक्काची जागा या सर्व गोष्टी मनपाच्या निर्णयांमधून डावलल्या जात आहेत.मनपाने घेतलेल्या एकतर्फी निर्णयांमुळे नागपूर शहर स्मार्ट सिटीच्या नावाखाली एका कडेलोटाकडे झुकत आहे. नागपूरचे वैभव असलेली हिरवळ आता भूतकाळ ठरण्याच्या मार्गावर आहे.