नळगंगा धरणात मुबलक पाणी असूनही शहरात पाणीटंचाई कशी होऊ शकते? नगर पंचायतीच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना पाणी शोधताना भटकंतीला सामोरे जावे लागत आहे.
उन्हाच्या कडाक्याने तापलेले शहर आणि त्यातच पाण्यासाठीची वणवण, हीच सध्या स्थानिक नागरिकांची दैनंदिन व्यथा बनली आहे. बुलढाणा शहराच्या जवळच असलेल्या नळगंगा धरणात भरपूर पाणीसाठा असतानाही अनेक प्रभागांना पाणीपुरवठा होण्यास आठवड्याहून अधिक काळ लागतोय. या परिस्थितीमागे नगर पंचायत प्रशासनाचा नियोजनशून्य कारभार आणि कर्मचाऱ्यांची मर्जीतून चाललेली पाण्याची वाटप पद्धत जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात नगर पंचायतमार्फत 17 प्रभागांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. पूर्वी प्रभागनिहाय आणि ठराविक क्रमवारीनुसार सर्वांना समान वेळेत पाणी मिळत होते. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून ही व्यवस्था ढासळली आहे. काही प्रभागांना आठवड्याला एकदाच पाणी मिळते तर काही प्रभागांना दोन आठवडे उलटूनही नळातून थेंबदेखील येत नाही. परिणामी, नागरिकांना टँकर किंवा दूरच्या विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे.
कोरडे पडले शहर
विशेष म्हणजे नळगंगा धरणात मुबलक जलसाठा असूनही नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. शहरातील काही स्थानिक जलस्रोत उन्हामुळे कोरडे पडले आहेत आणि तापमान 42 अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. अशा कडक उन्हात पाण्याची गरज वाढली असून त्यातही असममित पाणीपुरवठ्यामुळे लोकांच्या त्रासात भर पडली आहे.
Harshwardhan Sapkal : इंजिन चालवायला भाजपचं, इंधन वापरलं काँग्रेसचं
नागरिकांत संतापाचे वातावरण असून, नगर पंचायतीने तातडीने कारवाई करत संपूर्ण शहरात नियोजित आणि समान पद्धतीने पाणीपुरवठा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. काही नागरिकांनी असेही आरोप केले आहेत की, संबंधित कर्मचारी काही विशिष्ट प्रभागांना प्राधान्य देत असून इतर भागांना दुर्लक्षित केले जात आहे.
मर्जीनुसार काम
या पार्श्वभूमीवर, पाणीपुरवठा सभापती शेख तसलीम शेख सलीम यांनी स्पष्टीकरण देत सांगितले, पाणीपुरवठा करताना कर्मचाऱ्यांनी मर्जीनुसार काम केल्याचे निदर्शनास आले. संबंधित कर्मचाऱ्याला समज देण्यात आली असून पुढील काळात क्रमवारीनुसारच पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. भविष्यात असा प्रकार पुन्हा घडल्यास कडक कारवाई केली जाईल.
संपूर्ण प्रकरणातून प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी स्पष्टपणे समोर येत आहेत. उन्हाच्या झळा आणि पाण्याची टंचाई एकत्र सहन करणाऱ्या नागरिकांनी आता आवाज बुलंद केला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर सुधारणा करावी अन्यथा याचा तीव्र जनक्षोभ ओढवण्याची शक्यता आहे.
