
बुलढाणा येथे झालेल्या छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्यात शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचा एक खास क्षण चर्चेचा विषय ठरला.
स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या, धर्मासाठी बलिदान देणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मे रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पुरंदरच्या किल्ल्यावर 1657 मध्ये जन्मलेल्या संभाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा झेंडा अभिमानाने फडकवला आणि इतिहासात अजरामर ठरले. राजे संभाजी हे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांचे ज्येष्ठ पुत्र. सईबाईंच्या निधनानंतर त्यांचं पालनपोषण मासाहेब जिजाऊ यांनी केलं. लढाई कधीही न हरलेला, आणि शत्रूंना थरथर कापायला लावणारा राजा अशी त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांची जयंती केवळ एक ऐतिहासिक दिवस नसून, ही एक प्रेरणा देणारी सांस्कृतिक उर्जा ठरते.
12 मे रोजी बुलढाणा शहराच्या हृदयस्थानी जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव 2025 अंतर्गत शिवशंभो गर्जना या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात अभिजित जाधव आणि अम्मु जाधव यांच्या स्फूर्तीदायक आवाजात गगनभेदी शिवगर्जना, लोकगीतं, गोंधळ, पोवाडे आणि शिवभक्तीने भरलेली गाणी सादर झाली. बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे अध्यक्षस्थानी होते. शिवशंभो गर्जना कार्यक्रमातून बुलढाण्याची समृद्ध संस्कृती, शिवभक्ती आणि पारंपरिक कलांचा अभिमानाने झळकाव झाला.

Chandrashekhar Bawankule : नागपूर ग्रामीणसाठी दोन अध्यक्षांची नेमणूक
नेत्याची वेगळी छबी
कार्यक्रमात एक खास क्षण होता, जो संपूर्ण सोहळ्याच्या लक्षवेधी केंद्रस्थानी ठरला. तो म्हणजे आमदार संजय गायकवाड यांचा शिवशंभो गर्जना तालावर घेतलेला जल्लोषपूर्ण ठेका. संजय गायकवाड यांचा नृत्याविष्कार पाहून सोशल मीडियावर चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. राजकारणाच्या तणावातून बाहेर पडून सण साजरा करणं महत्त्वाचं आहे, असं यातून व्यक्त केलं जात आहे. त्यांच्या एनर्जीचं कौतुक झालं आणि अनेकांनी हा व्हिडीओ व्हायरल केल्याने तो चर्चेचा विषय बनला. वादग्रस्त विधानांसाठी ओळख ही संजय गायकवाड यांच्याबाबतची सर्वसामान्य प्रतिमा असली, तरी ती त्यांचं केवळ एकच रूप दर्शवते.
जरी ते अनेकदा आपल्या बेधडक भाषणांमुळे चर्चेत आले असले, तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळाच, उत्साही आणि लोकांशी सहज मिसळणारा पैलाही आहे. जो अलीकडे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. राजकीय व्यासपीठावर आक्रमक शैलीने भाषणं झोडणारे संजय गायकवाड हे सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये मात्र एका रंगेल मनाच्या कलाकारासारखे रमलेले पाहायला मिळतात. याचं ताजं उदाहरण म्हणजे सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा त्यांचा नृत्य. यापूर्वीही आमदार संजय गायकवाड यांच्या वाघ्या मुरळी नृत्यांचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. बुलढाण्यात साजरी झालेली शिवशंभो गर्जना आणि आमदार संजय गायकवाड यांचा ठेका या सगळ्या उत्सवाला रंगतदार आणि लक्षात राहणारा क्षण देऊन गेला.