
राजकीय रंगमंचावर पुन्हा एकदा एकत्रतेच्या चर्चेचा नवा अंक रंगू लागला आहे. पण अमोल मिटकरींच्या ठाम भूमिकेने या नाटकाच्या पडद्यामागचं खरं वास्तव उजेडात आलंय.
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकीकरणाच्या चर्चा रंगत आहेत. अशात सत्ताधारी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी या चर्चांना पूर्णविराम देणारे ठोस विधान केले आहे. राष्ट्रवादीच्या एकीकरणासंबंधी जे काही दावे केले जात आहेत, त्या सगळ्या बातम्या अफवांवर आधारित आहेत. त्या पद्धतशीरपणे पेरण्यात आल्या आहेत, असे मिटकरी यांनी ठणकावून सांगितले. याचबरोबर, जर भविष्यात अशा प्रकारचे एकीकरण होणार असेल तर आमच्या ठाम अटीशर्ती असतील, हेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्याचे क्रीडामंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत अजित पवार यांनी शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली, असा दावा काही माध्यमांनी केला. मात्र, अमोल मिटकरी यांनी हा दावा खोटा ठरवला. मिटकरी म्हणाले, मी स्वतः त्या बैठकीला उपस्थित होतो. अजितदादांनी एकीकरणासंदर्भात काहीही म्हटले नाही. ही खोटी माहिती पेरण्यात आली आहे. या अफवांच्या मागे काही सूत्रांचा आधार घेतला गेला आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

आधी माफी मागावी
मिटकरी पुढे म्हणाले, बैठकीतील गोष्टी बाहेर जाणं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे. अशा गोष्टी करणाऱ्यांवर पक्षाने कडक कारवाई करायला हवी. मिटकरी यांनी राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत काही महत्त्वाच्या अटींवरही भाष्य केले. आमच्यावर आणि अजित पवारांवर पातळी सोडून टीका करणाऱ्यांनी आधी माफी मागावी. त्यानंतरच कोणतीही एकीकरणाची चर्चा होऊ शकते, असा त्यांचा रोखठोक इशारा आहे. त्यांनी शरद पवार यांच्याबद्दल आदर व्यक्त करत सांगितले की, शरद पवार हे आमचे मार्गदर्शक आहेत. पण जर एकत्र येण्याची वेळ आलीच, तर ती फक्त अजित पवार यांच्या नेतृत्वाखालीच शक्य आहे.
भाजपचा टोला
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही राष्ट्रवादीच्या संभाव्य एकीकरणावर टीका करत पवार कुटुंबाला लक्ष्य केलं. शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हेच खरे राष्ट्रवादी. गेल्या तीन वर्षात अनेक वेळा एकत्र येण्याच्या चर्चा झाल्या, पण त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत. जयंत पाटील आणि रोहित पवार यांचं या चर्चेत फारसं स्थान नाही, असा खोचक टोला त्यांनी लगावला. शरद पवार गटानेही या चर्चांना थांबवत, निर्णय सुप्रिया सुळे यांच्या हातात सोपवला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना विचारात घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.
Siddharth Kharat : तलवार हातात, ठेका पायात; आमदाराचा वरातीत धमाका
हालचालींना वेग
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आणि काँग्रेस नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. आमदार सचिन अहिर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भेटींमुळे महाविकास आघाडीच्या पुढील रणनीतीविषयीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. अमोल मिटकरींचा ठाम पवित्रा, माध्यमांतून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर त्यांची थेट कारवाईची मागणी आणि राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याविषयी त्यांची स्पष्ट भूमिका. हे सर्व राज्याच्या राजकारणात एक नवे वळण देऊ शकते. येत्या काळात या चर्चांना खरे स्वरूप लाभते का, की या चर्चा फक्त चर्चाच राहतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.