
माजी खासदार नवनीत राणांनी स्पष्टपणे सांगितले आहे की त्या अमरावती महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी थेट युवा स्वाभिमान पक्षावर निशाणा साधला आहे.
राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असताना, अमरावतीच्या राजकारणात मोठा भूकंप घडला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर निवडणूक प्रक्रिया सुस्पष्टपणे मार्गी लागली आहे. अश्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी केलेल्या एका ठाम घोषणेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. नवनीत राणा यांनी स्पष्टपणे जाहीर केलं की, भाजप अमरावती महापालिका निवडणूक कोणत्याही युतीशिवाय, पूर्णतः स्वबळावर लढवणार आहे.
राणा यांनी असेही ठामपणे सांगितले की, या निवडणुकीनंतर महापौरपद भाजपच्याच ताब्यात राहणार आहे. या घोषणेनंतर अमरावती जिल्ह्यात राजकीय तणाव उफाळून आला असून, भाजपसोबत युतीबाबत महायुतीत अंतर्गत मतभेद प्रकर्षाने समोर येऊ लागले आहेत.अमरावती जिल्ह्यात नवनीत राणा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांच्यातील वाद नवीन नाही. पण या पार्श्वभूमीवर तो अधिक उग्र स्वरूप धारण करू लागला आहे. नवनीत राणा यांच्या वक्तव्यानंतर संजय खोडके यांनी थेट राणा दांपत्यावर निशाणा साधत स्पष्ट इशारा दिला आहे.

रणनीतीची पुनरावृत्ती
खोडके म्हणाले की, भाजपसोबत युतीचा निर्णय जर वरच्या स्तरावर झाला असेल, तरी त्या युतीत युवा स्वाभिमान पक्ष असेल तर आमची सहमती शक्य नाही. अशा परिस्थितीत आम्ही स्वतंत्ररित्या स्वबळावर निवडणूक लढू. त्यामुळे अमरावतीच्या राजकीय रंगमंचावर महायुतीतला अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. खोडके यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या भूमिकेवर आक्षेप घेतल्यामुळे भाजपला आता स्थानिक पातळीवर युतीचा फॉर्म्युला पुन्हा विचारात घ्यावा लागणार आहे, असं संकेत मिळत आहेत. खोडकेंच्या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने देखील स्वतःची रणनीती स्पष्ट केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच सांगितले होते की, भाजप जर स्वबळावर निवडणूक लढवत असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसदेखील त्यासाठी सज्ज आहे. या भूमिकेचीच पुनरावृत्ती करत संजय खोडके यांनी सांगितले की, भाजप अमरावती महापालिकेत स्वबळावर लढणार असेल तर आम्ही सुद्धा ती निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार आहोत. युतीचे दरवाजे पूर्णतः बंद असल्याचे त्यांनी स्पष्ट करत, आम्हाला भाजपसोबत युती चालेल, पण अमरावतीच्या स्थानिक पक्षांसोबत म्हणजेच युवा स्वाभिमानसारख्या पक्षासोबत आमचं ताळमेळ बसू शकत नाही, असं संजय खोडके यांनी ठणकावून सांगितले.
संजय खोडकेंचा युतीला ठाम नकार
राजकीय रंगत वाढली
यामुळे हे निश्चित की, राणा-खोडके संघर्ष आता थांबणार नाही, उलट निवडणुकीजवळ येत असताना तो अधिक तीव्र होणार आहे.अमरावती महापालिकेच्या निवडणुकीला आता राजकीय रंगत आली आहे. एकीकडे नवनीत राणा भाजपला पूर्ण ताकदीने पुढे नेत आहेत. तर दुसरीकडे संजय खोडके महायुतीतील समन्वय बिघडवत स्वबळाची भूमिका घेऊन समोर आले आहेत. त्यामुळे अमरावतीची ही निवडणूक महापालिका निवडणूक असली तरी प्रत्यक्षात ती राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरणार आहे.