प्रशासन

Nagpur Municipal Corporation : सीताबर्डीत वाहतूक सुरळीत, नागरिक सुखावले

Encroachment : अतिक्रमणविरुद्ध महापालिका पोलिसांची संयुक्त कारवाई

Post View : 47

Author

नागपूरच्या सीताबर्डी मेन रोडवर अतिक्रमण हटवून वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी महापालिका व पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या मोहिमेनंतर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कडक निर्देश दिले.

सीताबर्डीतील वाहतूक कोंडीचा ताण आता काहीसा हलका होणार आहे. नागपूर महानगरपालिका आणि नागपूर पोलिसांनी संयुक्तरित्या राबवलेल्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे मुख्य रस्त्यांवरील अडथळे दूर होऊ लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी सीताबर्डी मेन रोडवर प्रत्यक्ष भेट देऊन वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेतला.

डॉ. अभिजित चौधरी यांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना ठाम शब्दांत इशारा दिला की, अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. माल जप्त केला जाईल. यावेळी पोलीस आणि मनपा अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. सीताबर्डीतील अंतर्गत गल्ल्या, मोदी क्रमांक 1, 2, 3 तसेच इतर गर्दीच्या भागात देखील अशाच प्रकारची मोहीम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Prakash Ambedkar : पदाची प्रतिष्ठा राखणे सरन्यायाधीशांचे कर्तव्य

फेरीवाल्यांचे स्थलांतर

एप्रिल 2024 मध्ये राज्य सरकारने जाहीर केलेल्या राजपत्र अधिसूचनेनुसार, सीताबर्डी मेन रोडवरील बहुतेक फेरीवाल्यांना हटवून त्यांना महाराजबाग रोडवर नव्याने जागा देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य रस्ता अतिक्रमणमुक्त झाला आहे. नागरिकांसाठी अधिक मोकळी आणि सुरक्षित जागा उपलब्ध झाली आहे. यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. आता या रस्त्यावर चारचाकी व दुचाकी वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख व्यावसायिक भाग असलेल्या सीताबर्डीच्या आराखड्यात महत्त्वाचा बदल झाला आहे. त्याचा थेट फायदा नागरिकांना होणार आहे.

मनपा आयुक्तांनी अतिक्रमण विभागाला आदेश दिले आहेत की, दुकानाबाहेर माल ठेवणाऱ्या दुकानदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. यामध्ये जे दुकानदार फूटपाथवर किंवा वाहनांच्या मार्गात अडथळा निर्माण करतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसह त्यांच्या वस्तू जप्त करण्यात याव्यात. वाहतूक विभागालाही पार्किंगसाठी स्पष्ट आणि दृश्यमान संकेतचिन्हे लावण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना योग्य ठिकाणी वाहन उभे करण्याची सवय लागेल व वाहतूक अधिक सुकर होईल.

Akola : रस्त्याच्या गतिमान विकासासाठी आमदाराचे निर्देश 

तत्काळ निरीक्षण

डॉ. चौधरी आणि पोलीस उपायुक्तांनी महात्मा गांधी पुतळा ते पारेख ज्वेलर्सपर्यंत स्वतः पायी फिरून रस्त्यांची पाहणी केली. वाहतूक व्यवस्थेतील अडथळे, अतिक्रमणाची ठिकाणं आणि पार्किंगची उपलब्धता याचा सखोल आढावा घेण्यात आला. दररोज दुपारी 12 ते रात्री 10 या वेळेत मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे अधिकारी या भागात कार्यरत राहतील. यामुळे अतिक्रमण पुन्हा सुरू होण्यास अटकाव होईल.

हॉकर्स झोन हलविल्यानंतर सीताबर्डी मेन रोडच्या दोन्ही बाजूंना पार्किंगची स्पष्ट व्यवस्था करण्यात आली आहे. चारचाकी वाहनांसाठी पार्किंग ग्लोकल मॉलपासून बाटा शोरूम, वेरायटी चौक ते नोवेल्टी, बॉम्बेवाला शॉपपासून ड्रीम शॉप आणि वेंकटेश मार्केट ते पारेख ज्वेलर्स शॉप या भागांमध्ये उपलब्ध आहे. दुचाकी वाहनांसाठी वेरायटी चौकच्या डाव्या बाजूला बाला फुटवेअर ते राजा ऑप्टिकल, सिल्की लाउंज शॉप ते खादी ग्रामोद्योग शॉप आणि जोशी आइसक्रीमपासून पारेख ज्वेलर्सच्या जुन्या दुकानापर्यंत पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

सीताबर्डी परिसरातील दुकानदार, ग्राहक आणि रहिवाशांमध्ये या निर्णयामुळे समाधान व्यक्त होत आहे. अतिक्रमणमुक्त रस्त्यांमुळे चालणाऱ्या नागरिकांची सुरक्षितता वाढली आहे तर वाहतूक अधिक सुरळीत झाली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या या प्रयत्नाला आता नागरिकांनीही साथ देणे गरजेचे आहे, जेणेकरून ही व्यवस्था कायमस्वरूपी टिकून राहील.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!