
नागपूरच्या झळाळत्या सराफा बाजारावर शुक्रवारी ईडीने वज्रप्रहार करत अव्वल व्यापाऱ्यांवर धाडसत्र राबवले. या कारवाईत सोन्याची तस्करी, हवालाच्या व्यवहारांचा जाळं आणि काळ्या पैशाचा स्रोत उघड झाला.
नागपूर शहर पुन्हा एकदा आर्थिक गैरव्यवहारांच्या खळबळजनक प्रकरणामुळे चर्चेत आले आहे. शुक्रवारी, 23 मे रोजी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) पथकाने नागपुरातील दोन मोठ्या ठिकाणांवर धाड टाकली. हवाला व्यावसायिक शैलेश लखोटीया व सराफा व्यापारी पुरूषोत्तम कावळे यांच्या विविध ठिकाणांवर एकाचवेळी धाड टाकून मोठ्या कारवाईला सुरुवात केली.
सूत्रांच्या माहितीनुसार, ईडीचे पथक गुरुवारीच नागपुरात दाखल झाले होते. 23 मे शुक्रवारी स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी ही योजलेली कारवाई अंमलात आणली. कारवाईची सुरूवात झाली इत्तवारीतील पुरूषोत्तम कावळे यांच्या ‘सागर ज्वेलर्स’ या प्रतिष्ठानावर छापा टाकून. काही दिवसांपूर्वीच डीआरआयने (DRI) केलेल्या सोन्याच्या तस्करीप्रकरणातील कावळेंचा सहभाग उघड झाल्यानंतर ते तपास यंत्रणांच्या रडारवर होते. त्या कारवाईत कावळे कोलकात्यात अटकेत होते, तर त्यांच्यासोबत असलेला दुसरा व्यापारी निसटून गेला होता.

चौकशीसाठी ताब्यात
याच दरम्यान, गांधीसागर परिसरातील इंदिरानगरजवळील त्यांच्या सदनिकेतही ईडीच्या अधिकाऱ्यांनी प्रवेश केला व चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेतले. दुसरीकडे, शहरातील हवाला व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतलेला शैलेश लखोटीया याचे घर व कार्यालय ईडीच्या पथकांनी झडप घालून झाडून टाकले. शैलेशवर ऑनलाईन सट्टा नेटवर्क चालवण्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 2007- 08 मध्ये त्याच्या दोन भावांची निर्घृण हत्या झाली होती. ही बाब त्याच्या नावाभोवती असलेले गूढ अधिकच गडद करते.
या कारवाया केवळ नागपूरपुरत्याच मर्यादित नव्हत्या. यापूर्वी 14 मे रोजी आयकर विभागाने अकोल्यातील चार नामांकित सराफा प्रतिष्ठानांवर छापे टाकून करचुकवेगिरीचा पर्दाफाश केला होता. ‘पूनम ज्वेलर्स’ व ‘प्रकाश ज्वेलर्स’, राजेश अटलानी यांचे ‘एकता ज्वेलर्स’ आणि प्रकाश लोधिया (जैन) यांचे ‘ईशा ज्वेलर्स’ या दुकांनांवर एकाचवेळी कारवाई करण्यात आली होती. यासोबत अमरावती, यवतमाळ, परतवाडा येथील एकूण 17 शाखांवर तपास सुरू करण्यात आला.
या सलग कारवायांमुळे विदर्भातील सराफा व हवाला नेटवर्कमध्ये खळबळ माजली असून, अनेक दिग्गज व्यापारी तपास यंत्रणांच्या सूचीत आल्याची जोरदार चर्चा आहे. ईडी व आयकर विभागाचे पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सराफा व्यवहार आणि हवाला नेटवर्कवरील हा जोरदार झटका विदर्भात पारदर्शक व्यापार व्यवस्थेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल का, याचे उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.