महाराष्ट्र

Indian Railways : इंजिनाच्या हृदयात उजळले विदर्भाचे नाव 

Nagpur : अजनीच्या लोकोकॅबने भरला नवनिशाचा विजयी श्वास 

Post View : 101

Author

विदर्भाच्या अजनी इलेक्ट्रिक लोको शेडने देशाच्या रेल्वे नकाशावर आपली चमकदार छाप उमटवली आहे. बनारस येथे झालेल्या राष्ट्रीय लोको कॅब सुधारणा स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून अजनीने नावीन्य, सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा उत्तम संगम साधला आहे.

भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागातील नागपूर येथील अजनी इलेक्ट्रिक लोको शेडने राष्ट्रीय पातळीवर आपले नाव उज्वल केले आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स येथे नुकत्याच पार पडलेल्या सर्वोत्तम लोको कॅब सुधारणा स्पर्धेत अजनी शेडने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. यामुळे मध्य रेल्वेचा आणि विदर्भाचा मान संपूर्ण देशात उंचावला आहे.

अजनीला मिळालेला हा सन्मान कानपूर सेंट्रल आणि विशाखापट्टणम-वाल्टेयर विभागासोबत वाटून देण्यात आला आहे. ही स्पर्धा केवळ एक स्पर्धा न राहता, नवोपक्रम, चालक सुरक्षितता व कार्यक्षमतेच्या दिशेने घेतलेली एक मोठी झेप ठरली आहे. रेल्वे प्रशासनाच्या ‘स्मार्ट लोकोमोटिव्ह, सुरक्षित आणि आरामदायी प्रवास’ या ध्येयाच्या दिशेने हा एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

तांत्रिक उत्कृष्टतेचा नमुना

या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झालेला लोकोमोटिव्ह म्हणजे लोको क्रमांक 33330 / WAG-9HC – एक उच्च हॉर्सपॉवर असलेले ब्रॉड गेज एसी मालवाहू इंजिन. या लोकोमध्ये केलेली कॅब सुधारणा सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा उत्कृष्ट संगम आहे. यामध्ये नवीन रंगसंगती, सुसज्ज व आकर्षक पॅनेलिंग, डिझायनर डॅशबोर्ड, आणि उष्णतारोधक हेडलाइनर यांचा समावेश आहे. यासोबतच फोल्डेबल पडदे, रेट्रो-रिफ्लेक्टिव्ह बँड्स, एलईडी लाइटिंग, आणि ऑटोमॅटिक परफ्युम डिस्पेन्सर यांसारख्या लघु पण महत्त्वपूर्ण सुविधा देखील दिल्या गेल्या आहेत. ज्यामुळे चालकांचा अनुभव अधिक सुखद होतो.

Bhandara : लाखनीत खतांच्या बनावट साखळीचा पर्दाफाश

स्मार्ट प्रणाली 

संचालन सुरक्षितता आणि कार्यक्षम नियंत्रणासाठी सुधारित लोकोमध्ये अत्याधुनिक प्रणालींचा समावेश करण्यात आला आहे. सहाय्यक लोको पायलटसाठी स्वतंत्र डिस्प्ले व डायग्नोस्टिक युनिट, पॉलीकार्बोनेट लूकआउट ग्लास, इलेक्ट्रिक वायपर, आणि QR कोडद्वारे तत्काळ माहितीची उपलब्धता यामुळे कामकाज अधिक गतिमान व सुलभ होते. त्याचप्रमाणे, रीयल टाइम डेटा अक्विझिशन सिस्टीम, रिमोट डायग्नोस्टिक तंत्रज्ञान, एलईडी हेडलाईट्स, उष्णता प्रतिरोधक छत, तसेच क्रू व्हॉइस आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग यंत्रणा यांसारख्या प्रणालींमुळे सुरक्षा पातळीवर लक्षणीय वाढ झाली आहे. या सुधारणांमुळे केवळ सुरक्षाच नव्हे, तर लोको पायलटांचा मानसिक व शारीरिक आराम देखील सुनिश्चित होतो.

लोको पायलटांच्या दीर्घ आणि तणावपूर्ण प्रवासाचा विचार करून कॅबमध्ये अनेक सुसज्ज व आरामदायी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यात विशेषतः आरामदायी बसण्याची जागा, हाय-स्पीड फॅन व वातानुकूलन व्यवस्था, तसेच कूल बॉक्स, सन व्हायझर आणि भरपूर स्टोरेज स्पेस यांचा समावेश आहे. या सुविधा थकवा कमी करत लोको पायलटांची कार्यक्षमता व निर्णयक्षमता वाढवतात आणि त्यांना एका सुसंस्कृत, सुरक्षित व कार्यक्षम वातावरणात काम करण्याची संधी मिळते.

व्यवस्थापन अधिक सुलभ

लोकोमोटिव्हच्या कॅब, मशीन रूम व अंडरफ्रेममध्ये असलेल्या प्रत्येक उपकरणावर स्पष्ट व रंगीत लेबल्स लावण्यात आले आहे. त्यामुळे देखभालीचे कार्य अधिक सुलभ व जलद होईल. ही संपूर्ण कामगिरी म्हणजे मध्य रेल्वेच्या नवोपक्रमशीलतेचा, चालकप्रतीची संवेदनशीलता आणि सुरक्षित रेल्वेसेवेबाबत असलेल्या कटिबद्धतेचा स्पष्ट पुरावा आहे. विदर्भाच्या अजनी शेडने हे दाखवून दिले आहे की, उत्कृष्टतेकडे झेप घेण्यासाठी आधुनिक साधने, तंत्रज्ञान आणि मानवी कल्याण यांचा संतुलित मेळ अत्यंत आवश्यक आहे.

हा राष्ट्रीय सन्मान केवळ अजनी शेडचा नव्हे, तर संपूर्ण नागपूर विभागाचा, आणि अधिक व्यापक अर्थाने, विदर्भाच्या संभाव्यतेचा गौरव आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासात अजून एक तेजस्वी पान अजनी शेडच्या नावाने लिहिले गेले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!