महाराष्ट्र

Praful Patel : महायुतीच्या सावलीत, स्वबळाच्या प्रकाशात 

NCP : संघटन जिथे शक्य तिथे होईल, पण स्वतंत्र आवाजही सज्ज 

Post View : 43

Author

गोंदियाच्या मातीतून पुन्हा एकदा नेतृत्वाच्या आवाजाने झंकार उठली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या संवादातून जनतेच्या अपेक्षांना दिशा आणि राजकारणाला स्पष्ट भूमिका लाभली.

गोंदिया जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सकारात्मक संवादाचा महत्त्वपूर्ण टप्पा नुकताच गोंदिया येथे अनुभवायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या गोंदिया येथील निवासस्थानी जिल्ह्यातील नागरिक, सामाजिक संस्था आणि विविध घटकांशी दिलखुलास चर्चा केली. या चर्चेमध्ये शेती, सिंचन, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अडचणी यावर सखोल विचारविनिमय झाला. प्रफुल्ल पटेल यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. हे संवाद सत्र केवळ समस्या मांडण्यापुरते मर्यादित न राहता, त्या समस्यांवर कृती आराखडा ठरवणारे ठरले.

यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पटेल यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पटेल यांनी सांगितले, आपण महायुतीचा भाग आहोत आणि जिथे शक्य असेल तिथे महायुतीतूनच एकत्रितपणे वाटचाल करू. मात्र, काही ठिकाणी स्थानिक गणितांमुळे स्वतंत्र लढतही आवश्यक ठरू शकते. अशा ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल. हे समीकरण परिस्थितीजन्य असेल, पण उद्देश एकच, आणि ते म्हणजे ‘विकासाचे मजबूत नेतृत्व देणे’.

निधीवाढीबाबत स्पष्ट भूमिका

यावेळी ‘लाडकी बहिण’ योजनेच्या निधीमध्ये आदिवासी विभागाकडून 335 कोटींची वाढ करण्यात आल्याच्या आरोपावरही पटेल यांनी ठाम भूमिका मांडली. “लोकांना खोटे आरोप लावायची सवय झाली आहे. सरकारने ही योजना पुढील पाच वर्षे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यात त्यासाठीचा निधी एक हजार 500 रुपयांपेक्षा अधिक वाढवण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणाचा संदर्भ देत अजित पवार यांच्या कार्यकर्त्यावरील आरोपावर पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. या संदर्भात गुलाबराव पाटील यांनीही कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी तपासूनच पद देण्याचा सल्ला दिला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, आपल्या पक्षाचा ठाम निर्णय आहे की, कोणालाही सदस्यत्व देण्याआधी पारदर्शक चौकशी व्हावी. जर अशा गोष्टींची कल्पना आधीपासूनच असती, तर असे लोक पक्षात कधीच स्थान मिळवू शकले नसते. भविष्यातही अशा प्रकाराला आमच्याकडे थारा नसेल.

गोंदियात झालेली ही बैठक आणि संवाद यामुळे जिल्ह्यातील विकासाच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांनी घेतलेली स्पष्ट भूमिका ही केवळ राजकीय दिशा दर्शवणारी नसून, जनतेच्या समस्यांना प्राधान्य देणारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा आत्मविश्वास, विकासाचे वचन आणि जबाबदार राजकारण हे या संवादाचे ठळक वैशिष्ट्य ठरले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!