
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 358 पदांच्या नोकरभरती व सायबर घोटाळ्याने जिल्ह्याचे राजकारण आणि सहकार क्षेत्र ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने आता विशेष तपास पथक (SIT) या प्रकरणाचा तळ गाठणार आहे.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 358 पदांच्या नोकरभरतीत कथित भ्रष्टाचार आणि तब्बल 2.93 कोटींच्या सायबर घोटाळ्यामुळे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात मोठा भूकंप घडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणांची गंभीर दखल घेत विशेष तपास पथक (SIT) नेमण्याचे आदेश दिले आहेत. SIT चौकशीचे आदेश देणारे मुख्यमंत्र्यांचे स्वाक्षरी असलेले पत्र नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे बँकेच्या विद्यमान संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.
या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळातही प्रचंड चर्चेला सुरुवात झाली आहे. SIT चौकशीसाठी भाजपचे ज्येष्ठ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष आग्रह धरला होता. मुनगंटीवार यांनी या नोकरभरतीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा विधानसभेत उठवला होता. त्यांनी आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. या मुद्द्यावर भाजप ओबीसी सेलचे मनोज पोतराजे यांनी तब्बल 15 दिवस आमरण उपोषण केले होते. अखेर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश येत मुख्यमंत्री फडणवीस यांनी SIT चौकशीसाठी अधिकृत आदेशावर स्वाक्षरी केली.

Nagpur NCP : राष्ट्रवादीच्या नव्या पर्वाचे कंट्रोल टॉवर अनिल देशमुखांकडे
उत्सुकता शिगेला
बँकेतील भरती घोटाळा आणि सायबर फसवणूक या दोन्ही प्रकरणांचा तपशीलवार व पारदर्शक तपास आवश्यक आहे. SIT मार्फत सखोल चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. आता सर्वांचे लक्ष SIT तपासाच्या पुढील हालचालीकडे लागले असून, या तपासात कोणकोणते अधिकारी सहभागी होणार आणि चौकशीचा कक्ष किती विस्तृत असणार, याची उत्सुकता जिल्ह्यातील सहकार वर्तुळात शिगेला पोहोचली आहे. राजकीय गटबाजी, सत्ता संघर्ष आणि प्रशासनातील गोंधळ यामुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे होत असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तपासाचे परिणाम कोणत्या राजकीय नेत्यांवर होतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
जिल्हा बँकेत फेब्रुवारी महिन्यात घडलेल्या सायबर हल्ल्यात बँकेची 2.93 कोटी रुपयांची लूट झाली होती. या प्रकरणातही गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. विशेष म्हणजे बँकेने सायबर सुरक्षेसाठी तब्बल 100 कोटींचा खर्च केल्याचा दावा त्यांनी केला आहे. एवढा खर्च करूनही इतका मोठा सायबर घोटाळा होणे म्हणजे व्यवस्थेतील गंभीर त्रुटीचे लक्षण असल्याचे ते म्हणाले.
फॉरेन्सिक तपास
जोरगेवार यांनी बँकेच्या अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी विभागप्रमुख, संगणक सहाय्यक आणि सायबर सिक्युरिटी सेवा पुरवठादार यांच्यावर संगनमताने घोटाळा केल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी पोलीस महासंचालकांकडे या प्रकरणात फॉरेन्सिक तपास करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत झालेली चौकशी अपुरी व दिशाभूल करणारी असल्याने नवीन आणि स्वतंत्र तज्ज्ञांकडून ‘फॉरेन्सिक ऑडिट’ करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोरगेवार यांनी केली आहे.