
भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विसापूर येथील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बांधकाम प्रगतीवर लक्ष वेधत महिलेच्या शिक्षण आणि सक्षमीकरणावर भर दिला.
महिला सक्षमीकरण म्हणजे केवळ समानतेची मागणी नव्हे, तर समाजाला घडवण्याची शक्ती निर्माण करणारा एक क्रांतिकारी प्रवास आहे. शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मभान यांची सांगड घालणाऱ्या या प्रवासात एसएनडीटी महिला विद्यापीठाने गेल्या शतकभरात महिलांच्या आयुष्याला नवी दिशा दिली आहे. आता या परिवर्तनाच्या यशस्वी कहाणीला नवीन पंख देण्यासाठी राज्याचे माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार हे स्वतः पुढाकार घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर येथे आकार घेत असलेल्या विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसद्वारे महिला सक्षमीकरणाचा हा वटवृक्ष ग्रामीण मातीत रुजण्यास सज्ज झाला आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच विद्यापीठाच्या मुंबई मुख्यालयात भेट दिली. या वेळी विद्यापीठाच्या गरजांबाबत सखोल विचारमंथन करण्यात आले. कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा रंगली. विसापूरच्या परिसरात सुरू असलेल्या कॅम्पसच्या पायाभूत सुविधांपासून ते अध्यापन व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या गरजांपर्यंत, तसेच अभ्यासक्रमांच्या विस्ताराच्या दृष्टीने व्यापक संवाद साधण्यात आला. या प्रसंगी विद्यापीठाच्या विद्यार्थिनींनी हस्तनिर्मित चित्रफ्रेमद्वारे सुधीर मुनगंटीवार यांचे कलात्मक स्वागत केले.

Chandrapur : वनविभागाचा गोवर घोटाळा; हिरव्याच्या गाभाऱ्यात काळसर कुज
एसएनडीटी विद्यापीठाचा इतिहास
महिला शिक्षणाची क्रांती घडवणारे संस्थापक भारतरत्न धोंडो केशव कर्वे यांनी 1905 मध्ये महिला आश्रमाच्या रूपाने सुरू केलेल्या या चळवळीला 1916 मध्ये एसएनडीटी विद्यापीठाचे रूप मिळाले. पुढील वर्षी म्हणजेच 5 जुलै 2025 रोजी विद्यापीठ आपली 110 वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगाचे भव्य आयोजन करण्याच्या दृष्टीने देखील यावेळी नियोजनावर सविस्तर चर्चा झाली. हा कार्यक्रम केवळ एक सोहळा नसून, महिला सक्षमीकरणाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार असल्याचे मत या बैठकीतून समोर आले. शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर महिलांना सक्षम करण्यासाठी एसएनडीटी विद्यापीठाची भूमिका भविष्यात अधिक महत्त्वाची ठरणार आहे, हे ठसवण्याचा प्रयत्न या चर्चेतून दिसून आला.
बैठकीदरम्यान आमदार मुनगंटीवार यांनी खास करून बल्लारपूर येथे सुरू असलेल्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल या प्रकल्पाचा उल्लेख केला. या संकुलाच्या माध्यमातून महिला केवळ नोकरी मागणाऱ्या नाही, तर स्वतः नोकरी निर्माण करणाऱ्या उद्योजिका बनत आहेत. हेच खरे सक्षमीकरण आहे, असे ते म्हणाले. हे ज्ञानसंकुल म्हणजे महिलांच्या आत्मनिर्भरतेचा प्रात्यक्षिक नमुना आहे. यामध्ये विविध व्यावसायिक आणि उद्यमशीलतेशी संबंधित अभ्यासक्रम, कौशल्यविकासाचे प्रशिक्षण, आणि मार्गदर्शनाचे तंत्र समाविष्ट आहे. याच धर्तीवर विसापूर कॅम्पस विकसित झाल्यास, विदर्भातील महिलांसाठी तो एक प्रेरणास्थान ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
समन्वयातून स्वप्न साकार
एसएनडीटी महिला विद्यापीठाने आजवर अनेक विद्यार्थिनींचे जीवन घडवले आहे. विसापूरमध्ये आता उभ्या राहणाऱ्या नव्या कॅम्पसच्या माध्यमातून या वाटचालीला नवीन उंची मिळणार आहे. सरकार, समाज आणि शिक्षणतज्ज्ञांच्या समन्वयातून हे स्वप्न साकार करण्यासाठी ही बैठक एक ठोस पाऊल ठरली आहे. 110 वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्यापीठाने नव्या युगात प्रवेश करताना महिला शिक्षणाची, स्वावलंबनाची आणि सर्जनशीलतेची नवीन दिशा ठरवण्याचे संकल्प केले आहेत. आता या संकल्पांना कृतीची जोड मिळावी, हीच सर्वांची अपेक्षा.