
आमदार अमोल मिटकरी यांनी हाके-कुंटे यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल करून राजकारणात खळबळ उडवली. या क्लिपमुळे निवडणुकीतील सौदेबाजीचा आरोप समोर आला आहे.
राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा एकदा आपल्या शैलीत राजकीय भूकंप घडवला आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि प्रहारचे ऍड. शेखर कुंटे यांच्यातील एक खळबळजनक ऑडिओ क्लिपच मिटकरी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून व्हायरल केली. या क्लिपमुळे हाके आणि त्यांच्यासोबत असलेल्या राजकीय गटांवर नवे वादळ निर्माण झाले आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही गंभीर आरोपांची चर्चा ऐकायला मिळते. हाके यांनी प्रहारच्या उमेदवारास उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपा नेतृत्वाशी मिळून आर्थिक देवाणघेवाण केली असल्याचा गौप्यस्फोट या क्लिपमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळेच मिटकरी यांनी पुन्हा एकदा वादात आणि चर्चेत स्थान मिळवले आहे.

आर्थिक देवाणघेवाणीचे आरोप
लक्ष्मण हाके यांच्यावर यापूर्वीही अमोल मिटकरी यांनी अनेकदा टीका केली आहे. मात्र, यावेळी त्यांनी थेट ऑडिओ पुरावा समोर आणत प्रहारच्या नेतृत्वालाही अडचणीत आणले आहे. शेखर कुंटे यांनीही या क्लिपमधील संवाद आपलाच असल्याचे मान्य केले आहे. त्यांनी क्लिपमधील आवाज आपला आणि हाके यांचाच असल्याचे जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे या प्रकाराला अधिकच गांभीर्य प्राप्त झाले आहे. मिटकरी यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि वेळेवर ही क्लिप व्हायरल करत राजकीय आरोपांची धार अधिक तीव्र केली आहे. या क्लिपमुळे फक्त हाकेच नव्हे, तर भाजपा आणि ओबीसी समाजातील राजकीय समिकरणेही हादरली आहेत.
ऑडिओ क्लिपमध्ये व्यक्त झालेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. भोकर विधानसभा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार नामदेव आयलवाड यांना अर्ज मागे घेण्यासाठी भाजपा व प्रा. हाके यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप शेखर कुंटे यांनी थेट केला आहे. यासंदर्भात त्यांनी भोकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेवटी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. शेखर कुंटे यांनी न्यायालयात याचिकादाखल करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात न्यायालयात सत्य समोर येईल आणि आपल्याला न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
B.R Gavai : न्यायमंदिरातून योगींच्या नेतृत्वाला साष्टांग नमस्कार
रणनीतीचा राजकीय परीघ
नांदेडसारख्या संवेदनशील जिल्ह्यातील हे प्रकरण आता केवळ स्थानिक न राहता राज्यव्यापी पातळीवर पोहोचले आहे. ऑडिओ क्लिपमधील गंभीर मजकूर आणि त्यातून उपस्थित होणारे प्रश्न हे आगामी निवडणुकीत अनेकांचे समीकरणे बदलू शकतात. अमोल मिटकरी यांची स्पष्टवक्तेपणा आणि साहसी पावले पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहेत. या संपूर्ण प्रकरणामुळे मिटकरी हे विरोधी आवाज म्हणून अधिक प्रभावीपणे समोर येत आहेत. त्यांच्या या राजकीय मोहिमेचा पुढील टप्पा कोणता असेल, याकडे आता राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.