
ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि अजित पवार गटातील राष्ट्रवादी नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक रंगली आहे. दोन्हीकडून एकमेकांवर टीका आणि आरोपांचं सत्र सुरू आहे.
राजकारणात शब्दांच्या खडतर लढाया नवीन नाहीत. पण सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात रंगलेली खडाजंगी विशेषच लक्षवेधी ठरतेय. एकीकडे आरोप-प्रत्यारोपांची सरबत्ती सुरू आहे. तर दुसरीकडे हाके यांनी राष्ट्रवादीच्या काही प्रमुख नेत्यांवर अगदी रोखठोक शब्दांत टीकास्त्र सोडलंय. अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर केलेल्या टीकेनंतर हाके यांनीही जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. अजित पवार तुमचा माणूस बावचळला आहे, असं म्हणत त्यांनी अमोल मिटकरींवर तुफान फटकारा मारला.
ओबीसींच्या मुलांना अजित पवार वसतिगृह का देत नाहीत? असा थेट सवालही हाके यांनी केला आहे. हाके यांचा रोख स्पष्ट होता, अजित पवार हे शरद पवार यांच्या रिचार्जवर चालतात. आता त्यांना पंख फुटलेत, पण ते कुठे उडतायत हे मात्र कळत नाही. याचबरोबर त्यांनी दावा केला की, माझ्या मागे त्यांची संपूर्ण पलटण लावली आहे. अमोल मिटकरींचा स्क्रू ढिला झाला आहे.तुम्ही महायुतीत आहात की विरोधात? असा प्रश्न हाके यांनी मिटकरींना विचारला. आम्ही महायुतीला पाठिंबा दिला, तरी तुम्ही विरोध करता. हे दुहेरी धोरण आहे की दिशाभूल? असं सांगत त्यांनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोंधळावर बोट ठेवलं.

Chandrashekhar Bawankule : सौरपंपांचं ऊर्जा शस्त्र, शेतीच्या भविष्याचं रण
दुहेरी धोरणांचा आरोप
हाके यांची टीका याठिकाणी थांबली नाही. सुरज चव्हाण, तुम्हाला गावातली कुत्रेसुद्धा ओळखतात का? असा रोखठोक सवाल करत त्यांनी चव्हाण यांना लक्ष्य केलं आहे. मी कलंक आहे की नाही, हे माझा ओबीसी समाज ठरवेल. मला तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा निर्वाणीचा इशारा हाके यांनी दिला. तटकरे यांच्यावरही हाके यांनी टीकेची झोड उठवली. महाराष्ट्रात होणाऱ्या 80 टक्के दारू उत्पादनावर सुनील तटकरे यांच्या पक्षाचे भांडवलदार आणि कारखानदारांची मक्तेदारी आहे, असं सांगत त्यांनी थेट आर्थिक हितसंबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.अमोल मिटकरी यांच्याकडून सतत येणाऱ्या ‘वायझेड’ शब्दाच्या वापरावरही हाके यांनी चपखल टिप्पणी केली.
जोपर्यंत वायझेडचा अर्थ सांगत नाही, तोपर्यंत आम्ही त्याला माकडच म्हणणार, असं त्यांनी स्पष्ट केलं. मी एका वाटीत तोडपाणी करतो, अजित पवार समुद्रात करतात, या शब्दांत त्यांनी राजकीय ताकद आणि व्याप्तीच्या तुलनेवर भाष्य केलं. त्याचबरोबर एका व्हायरल ऑडियो क्लिपबाबतही त्यांनी स्पष्टीकरण दिलं, उमेदवारी मागे घेतलेल्या माणसाबरोबर मॅनेजमेंट कसं होणार? असा सवाल करत त्यांनी ही क्लिप फेटाळून लावली. ओबीसी हक्क अधिकाऱ्यांवर कोणी आघात केला तर त्याचा जोरदार विरोध केला जाईल, असा स्पष्ट इशारा देताना हाके म्हणाले, जर आमच्या अधिकाऱ्यांवर अडचण आली, तर आम्ही महाराष्ट्र गदागदा हलवून जरांगेंनासुद्धा अडवू.शेवटी त्यांनी अत्यंत ठाम शब्दांत चेतावणी दिली आमच्या हक्क अधिकाऱ्यांना कोणी चॅलेंज केलं, तर आम्ही कोणालाही सोडणार नाही. मग ते सरकार असो किंवा जरांगे.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या शिस्तीच्या रडारखाली पीएस-ओएसडी