देश

Sunita Jamgade : चॅटिंगच्या धाग्यातून उलगडतंय पाक कनेक्शन

Digital Surveillance : मोबाईलमधून सापडले संशयास्पद अ‍ॅप्स

Author

नागपूरच्या सुनीता जमगडे या महिलेने एलओसी पार करून पाकिस्तानात प्रवेश केल्याने खळबळ उडाली असून, तिच्या मोबाईलमध्ये काही संशयास्पद आढळल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला असतानाच, त्याच काळात नागपूरच्या एका 43 वर्षीय महिलेने केलेल्या धक्कादायक कृत्यामुळे प्रशासनात खळबळ माजली आहे. सुनीता जमगडे नावाच्या या महिलेने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी पार करून थेट पाकिस्तानात प्रवेश केला. तेही अगदी शांततेच्या मार्गाने नव्हे तर संशयाच्या वळणावर. सुनीता गेल्या महिन्यात 14 मे रोजी पाकिस्तानात शिरली होती. कारगिल पोलिसांनी यावर तत्काळ कारवाई करत तिच्या विरोधात विशेष कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. कारगिलच्या विशेष तपास पथकाने नागपूर गाठले असून, प्राथमिक चौकशीही पार पडली आहे.

पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तिला पुन्हा कारगिलला घेऊन जाण्याची तयारी सुरू आहे. सुनीता जमगडेचा मोबाईल तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. तपासादरम्यान धक्कादायक गोष्ट म्हणजे, तिच्या फोनमध्ये पाकिस्तानी नागरिकांसोबत केलेली चॅटिंग उघड झाली. सुरुवातीला रत्न-खडे अशा व्यावसायिक विषयांवर बोलणारी चॅटिंग नंतर धर्मगुरूंशी संवाद आणि पाकिस्तानात कसे जावे यावर चर्चा करत असल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे, एका ‘जुल्फिकार’ नावाच्या व्यक्तीबरोबर तिला थेट संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले असून, याशिवाय एका ख्रिश्चन धर्मगुरूशी देखील पाकिस्तान प्रवेशाबाबतची सविस्तर चर्चा झाल्याचे आढळले आहे.

Maharashtra BJP : भाजपने दरवाजे उघडले, पण घरात वादळ शिरलं

एनआयएची चौकशी सुरू

संवादामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या पातळीवर अनेक प्रश्नचिन्हं उभी राहिली आहेत. सुनीता पाकिस्तानात गेलेल्या क्षणापासून नऊ दिवस तिथल्या गुप्तचर यंत्रणांच्या ताब्यात होती. या काळात तिच्या मोबाईलमध्ये स्पायवेअर अथवा मालवेअर इन्स्टॉल केले गेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तपास यंत्रणा याचा सखोल शोध घेत आहेत. फोनमधून काही संशयास्पद अ‍ॅप्स आढळून आले असून, त्यांचा मागोवा घेण्यासाठी विशेष फॉरेन्सिक टीम कामाला लागली आहे. मोबाईलमध्ये नेमकं काय डाऊनलोड करण्यात आलं, कोणी केलं, यावरून पुढचा तपास निश्चित होणार आहे. मुंबईस्थित राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

एनआयएने नागपूर पोलिसांना अधिकृत प्रश्नावली पाठवली असून, त्या उत्तरांच्या आधारे एनआयए पुढील कारवाईची दिशा ठरवणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच एक विशेष तपास टीम नागपूरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तपासातून सुनीता जमगडे हिला काश्मीरमधील काही स्थानिक नागरिकांकडून मदत मिळाल्याचेही स्पष्ट झाले आहे. या संदर्भात कारगिल पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या लोकल सपोर्टच्या सूत्रांवरून हे प्रकरण हनी ट्रॅप की आणखी काही याचाही शोध घेतला जाणार आहे. ही घटना भारतासाठी केवळ सीमा उल्लंघन नाही, तर डिजिटल युद्धातला एक नवीन आणि धोकादायक अध्याय उघड करणारी आहे.

नागपूरसारख्या शांत वाटणाऱ्या शहरातल्या सामान्य महिलेची गूढ पाकिस्तान यात्रा आता राष्ट्रीय चर्चेचा विषय बनली आहे. या प्रकरणातून काय निघणार आणि त्याचा देशाच्या सुरक्षेवर काय परिणाम होणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!