
अनेक महिन्यांपासून रखडलेल्या उपराजधानी नागपूर विधान भवनाच्या विस्तारीकरणाचा आराखडा तयार करण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
उपराजधानी नागपूरच्या स्वाभिमानाचा मानबिंदू असलेले नागपूर विधानभवन लवकरच नव्या, आधुनिक आणि पर्यावरणपूरक रूपात उभे राहणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला अखेर निर्णायक गती मिळाली आहे. विस्तारासाठी आवश्यक असलेल्या शासकीय जमिनीवरील वाद मिटल्याने प्रकल्पाची वाटचाल स्पष्ट झाली असून, पुढील नियोजनासाठी येत्या २५ जून रोजी मुंबईत उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरच्या विधानभवनात नुकतीच आढावा बैठक पार पडली.
बैठकीला महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, मुख्य अभियंता दिनेश नंदनवार तसेच विविध कार्यान्वयन यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या विस्तारयोजनेत एक गोष्ट स्पष्ट करण्यात आली आहे. नागपूरच्या हेरिटेज विधानभवन इमारतीला कोणताही धक्का न लागता तिच्या वैभवाला जपले जाणार आहे. याउलट, इमारतीच्या आसपासच्या उपलब्ध जागेत नव्या बांधकामाची रूपरेषा आखली जाईल. यावेळी पर्यावरणपूरक दृष्टिकोन ठेवत भरपूर प्रमाणात वृक्षारोपण करण्यावर भर देण्यात येणार आहे.

Yashomati Thakur : शेतकऱ्यांच्या मानगुटीवर सत्ताधाऱ्यांचे जुलूम
आधुनिक लोकशाही मंदिर
रस्ते रुंद व वाहतुकीस सुलभ करणारे असावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितले की, २५ जून रोजी मुंबईत होणाऱ्या बैठकीत संपूर्ण विस्तृत माहिती सादर करावी. त्यामध्ये नव्या इमारतींच्या डिझाइनपासून ते झाडांच्या नियोजनापर्यंत प्रत्येक बाबीचा समावेश असावा. बैठकीदरम्यान आणखी एक महत्त्वाचा विचार मांडण्यात आला. राजस्थानच्या विधिमंडळाच्या धर्तीवर नागपूरच्या विधिमंडळातही एक संग्रहालय उभारता येईल का याचा अभ्यास करण्यात येणार आहे. या संग्रहालयात महाराष्ट्राच्या संसदीय परंपरांचा इतिहास, जुनी दस्तऐवजीकरणे, दुर्मीळ छायाचित्रे, ऐतिहासिक घटना यांचे जतन व प्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
सोबतच एफएसआय (Floor Space Index), पुरातत्व विभागाच्या विविध परवानग्या, आणि नियामक बाबींची माहिती देखील आगामी बैठकीत सादर करण्याचे आदेश विधानसभा अध्यक्षांनी दिले. बैठकीनंतर ॲड. राहुल नार्वेकर यांनी स्वतः दोन्ही सभागृहे, मंत्रिमंडळ कार्यालये आणि संपूर्ण विधिमंडळ परिसराची पाहणी केली. प्रत्यक्ष पाहणी करताना त्यांनी विविध सूचनाही दिल्या, ज्यामध्ये अंतर्गत व्यवस्थापन, आधुनिक सुविधांची गरज आणि सौंदर्यीकरण यांचा समावेश होता. संपूर्ण प्रकल्पाचा उद्देश आहे नागपूरच्या लोकशाही मंदिराला एक नवे आधुनिक स्वरूप देणे, जे भविष्यातील कार्यप्रणालीला अधिक कार्यक्षम, समृद्ध आणि सुसज्ज करेल. त्यामुळे नागपूर विधानभवनाचा विस्तार केवळ वास्तुशास्त्रीय नाही, तर ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.