महाराष्ट्र

Nagpur : विदर्भाच्या मातीतून उगमणारं शाश्वत शेतीचं जागतिक विद्यापीठ 

Agri-Business School : शेतीच्या मळ्यातून स्टार्टअपच्या रिंगणात 

Author

विदर्भातील शेतीला जागतिक उंचीवर नेण्याचा निर्धार आता वास्तवात उतरतोय. नागपुरात उभारल्या जाणाऱ्या ‘ॲग्रोव्हिजन ग्लोबल ॲग्री बिझनेस स्कूल’द्वारे शेतकरी व तरुणांसाठी सुरू होतोय नवक्रांतीचा अध्याय.

विदर्भाच्या मातीतून जागतिक कृषी नेतृत्व घडविण्याचा निर्धार. कृषी क्षेत्राला आधुनिक विज्ञानाची जोड देत विदर्भातील तरुणांना जागतिक कृषी नवोदयाची दिशा देण्याचा संकल्प नागपूरमध्ये आकार घेत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ, उत्पादनांना जागतिक बाजारपेठ, आणि आधुनिक तंत्रज्ञानात तरुणांचे प्रशिक्षित नेतृत्व या त्रिसूत्रीवर उभ्या राहत आहे ‘ॲग्रोव्हिजन ग्लोबल ॲग्री बिझनेस स्कूल’!

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची घोषणा केली. यावेळी गडकरी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, शेती केवळ जगण्यासाठी नाही, तर जगाला दिशा देण्यासाठी असावी. विदर्भातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे त्यांना जागतिक संधी उपलब्ध करून देणे आणि कृषी शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना सक्षम करणे, हे ॲग्रोव्हिजनच्या या पुढाकारामागचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

बारीक अभ्यास 

या उपक्रमाच्या तयारीसाठी स्पेनमधील उच्चस्तरीय कृषी तज्ज्ञ शिष्टमंडळ विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. डेव्हीस मॉरेनो, फ्रांसिस्को जॅव्हियर आणि जॉन अँटीनिओ या तीन आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी विदर्भातील संत्रा उत्पादक भागाचा दौरा करून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी शेतकऱ्यांच्या गरजा, समस्यांचा बारकाईने अभ्यास केला आणि त्यासोबतच या भागातील असीम शक्यता पाहिल्या.

या संवादातून निर्माण झालेल्या विश्वासामुळेच या तज्ज्ञांनी नागपुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ॲग्री बिझनेस स्कूल स्थापन करण्यास सहमती दर्शविली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत या शाळेचे स्वरूप, अभ्यासक्रम, स्टार्टअपसाठी विशेष केंद्रे, निर्यातीसाठी मार्गदर्शन केंद्र, कृषी संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणाऱ्या सुविधा या सर्वांचा समावेश असलेले विस्तृत खाके तयार करण्यात आले.

Harish Pimple : देवा भाऊंच्या जंगी स्वागतासाठी आमदार झाले सज्ज

स्पेनमधील कृषी तंत्रज्ञान 

या शाळेद्वारे केवळ शिक्षण नव्हे तर प्रत्यक्ष प्रशिक्षण, जागतिक कंपन्यांशी भागीदारी, कृषी स्टार्टअप्ससाठी इनक्युबेशन सेंटर आणि डिजिटल कृषी यंत्रणा यांचा लाभ शेतकऱ्यांना व तरुणांना मिळणार आहे. विशेष म्हणजे भारत आणि स्पेनमधील कृषी तंत्रज्ञानाचे आदानप्रदान घडवून आणण्यासाठी ‘ॲग्रोव्हिजन फाउंडेशन’ कडून एक विशेष सहकार्य कार्यक्रमही राबवण्यात येणार आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कांचन गडकरी, ॲग्रोव्हिजन फाउंडेशनचे अध्यक्ष रवी बोरटकर, मार्गदर्शक डॉ. सी. डी. मायी, महाऑरेंजचे अध्यक्ष श्रीधर ठाकरे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रशांत कडू आणि विदर्भातील नामांकित संत्रा उत्पादक शेतकरी उपस्थित होते. या पुढाकारामुळे विदर्भाच्या मातीला एक नवी ओळख मिळणार आहे. शेतीतील पारंपरिकतेपासून आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या विदर्भासाठी हा एक मैलाचा दगड ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!