महाराष्ट्र

Bacchu Kadu : तातडीने उपचार हवा, अन्यथा जीवाला धोका 

Amravati : रुग्णालयाचा अहवाल, बच्चू कडूंना आयसीयूत दाखल करण्याची गरज 

Post View : 28

Author

प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू जीवाच्या ताटातूटीत आंदोलनावर ठाम उभे आहेत. तिवसाच्या डॉक्टरांनी दिलेला इशारा थरकाप उडवणारा आहे. तत्काळ ICUमध्ये दाखल न केल्यास जीवाला धोका’.

जर तातडीने आयसीयूमध्ये दाखल केलं नाही, तर बच्चू कडू यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, हा स्पष्ट आणि धोक्याचा इशारा दिलाय तिवसा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवराज माने यांनी. सात दिवसांपासून अन्नत्याग करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस चिंताजनक घसरण होत आहे. तिवसा येथील वैद्यकीय तपासणीनंतर पाठवलेल्या अधिकृत पत्रात डॉ. माने यांनी तहसील प्रशासनाला सूचित केलं आहे की, कडू यांचं आरोग्य अत्यंत नाजूक अवस्थेत पोहोचलेलं आहे. त्यांना तत्काळ अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करून उपचारांची आवश्यकता आहे.

गेल्या सात दिवसांपासून एक कणही अन्न न घेतलेल्या कडू यांच्या पचनसंस्थेवर ताण येऊन उलट्यांचे सत्र सुरू झालं आहे. तरीही, त्यांनी आपलं आंदोलन सुरुच ठेवलं असून वैद्यकीय उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. डॉक्टरांनी औषधोपचाराची शिफारस केली असली, तरी कडू यांचा निर्धार अजिबात कमी झालेला नाही. त्यांच्या या अडिग भूमिकेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता वाढली आहे. कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनस्थळी आता सुरक्षेच्या दृष्टीने 200 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलनाचा परिसर अक्षरशः पोलीस छावणीतच परावर्तित झाला आहे. कार्यकर्ते, समर्थक आणि स्थानिक नागरिकांचा ओघ सुरूच असून, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

मंत्र्यांच्या भेटी 

आज राज्य सरकारकडूनही हालचाली वाढल्या आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत सकाळी आंदोलनस्थळी भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी 2 वाजता महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे बच्चू कडू यांची भेट घेणार असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे की, बच्चू कडू यांची पुढील भूमिका काय असेल? डॉ. शिवराज माने यांच्या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की, “कडू यांना वेळेत रुग्णालयात दाखल न केल्यास त्यांची प्रकृती अधिकच बिघडू शकते. त्यामुळे अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ICU मध्ये त्यांच्यासाठी तात्काळ व्यवस्था करण्यात यावी.

Amravati : मुख्यमंत्र्यांचा कडूंना फोन, शेतकरी डिमांड्स इन ‘ग्रीन झोन’

बच्चू कडू आपल्या अन्नत्याग आंदोलनावर ठाम असून, कोणताही वैद्यकीय हस्तक्षेप नाकारत आहेत. त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतोय की, त्यांच्या जीवाच्या सुरक्षिततेसाठी पुढचं पाऊल कोण उचलणार? राजकीय प्रश्नांवरील संघर्ष हे लोकशाहीचं रूप आहे. पण जेव्हा एखाद्या नेतृत्वाचं आरोग्य आणि प्राण धोक्यात येतात, तेव्हा मानवतेचा आवाज अधिक मोठा असावा लागतो. बच्चू कडू यांच्या मागण्यांचं भवितव्य काहीही असो, त्यांच्या जीवनरक्षणासाठी सर्वांनी मिळून पावलं उचलणं ही काळाची गरज बनली आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!