
राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोर धरू लागले असतानाच, शिवसेना शिंदे गट लवकरच आपला एकोणीसावा वर्धापन दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची चाहूल हळूहळू राज्यभर पसरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वारे वेगवेगळ्या दिशेने वाहू लागले आहेत. या राजकीय थरारात आता शिवसेना शिंदे गटाचा एकोणीसावा (19) वर्धापन दिन देखील साजरा होणार आहे. 19 जून रोजी हा दिवस साजरा करताना शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण राज्यात संघटनात्मक फेरबदल करण्याच्या तयारीत आहेत. मात्र या संघटनात्मक बदलांची सविस्तर माहिती अद्याप कोणालाही समजलेली नाही. अकोला जिल्हा शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणात सध्या वादांची लाट उठली आहे.
गेल्या काही दिवसांत अकोला जिल्ह्यातील शिवसेना गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या आगामी फेरबदलांच्या यादीत अकोला नंतर नागपूर जिल्ह्यालाही मोठे महत्त्व दिले जात आहे. नागपूर हा शिवसेनेसाठी एक महत्त्वाचा किल्ला मानला जातो. त्यामुळे या जिल्ह्यात होणाऱ्या बदलांवर सर्वांचे लक्ष आहे. राज्यभराच्या संघटनात्मक फेरबदलांमध्ये नागपूर जिल्हा प्रमुखांची निवड आणि त्याच्याशी संबंधित अनेक संपर्क प्रमुखांची फेरबदल अपेक्षित आहे. या बदलांमुळे आगामी काळात शिवसेनेच्या स्थानिक राजकारणात मोठा बदल होणार असल्याची चाहूल सर्वत्र ऐकू येत आहे.

Akola Politics : अकोल्यात शिंदे – ठाकरे गट फुटीच्या उंबरठ्यावर
संपर्क प्रमुखांमध्ये बदल
महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाकडून होणाऱ्या संघटनात्मक फेरबदलांची माहिती फारशी बाहेर येत नसली तरी नागपूरसह अनेक जिल्ह्यांत याबाबत गुपिताच माहोल आहे. कार्यकारणीबद्दल तशी अंतिम यादी तयार झाली असून ती सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच ताब्यात आहे. अनेक जिल्हा प्रमुख बदलण्याची शक्यता असून काही संपर्क प्रमुखांमध्येही फेरबदल होणार आहे. इतर पक्षांतील काही नेते शिंदे गटात सहभागी होण्याची शक्यता असून त्यामुळे पक्षाची ताकद वाढवण्याचा मानस आहे. या फेरबदलांचा आराखडा गुरुवारपर्यंत (19 जून ) पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागपूर जिल्हा प्रमुखपदासाठी काही प्रमुख नावं समोर आली आहेत.
समीर शिंदे, शरद सरोदे, सूरज गोजे आणि जगत राम सिन्हा अशी काही नावे या पदासाठी आघाडीवर आहेत. नागपूर जिल्हा प्रमुख पदासाठी समीर शिंदे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. नागपूर जिल्हा प्रमुख पदासाठी काही नावे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली होती. त्यातील काही नावांवर आमदार कृपाल तुमाने यांनी आक्षेप घेतला आहे. राज्याच्या राजकीय परिस्थितीत होणाऱ्या या संघटनात्मक बदलांमुळे पुढील महिने महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाने आपल्या 19 वर्धापन दिनानिमित्त जाहीर होणाऱ्या या फेरबदलांमुळे पक्षाचा व्यापक विस्तार आणि राजकीय ताकद वाढेल, याची अपेक्षा आहे. आगामी काळात या फेरबदलांवर अधिक स्पष्टता येईल, अशी चर्चा रंगली आहे.