महाराष्ट्र

Bhandara Shiv Sena : एकनाथ शिंदेंचा दौरा रद्द; प्रवेशोत्सव स्थगित?

Political War : नरेंद्र भोंडेकरांची तयारी विरोधकांकडून ओव्हरटेक

Share:

Author

भंडाऱ्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने शक्तिप्रदर्शनाची पूर्ण तयारी केली. परंतु अचानक एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याला ब्रेक लागल्याने भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पूर्व विदर्भातील राजकारणात पुन्हा एकदा जोरात वादळ आले आहे. भंडाऱ्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाने मोठा प्रवेश मेळावा आयोजित करून जोरदार शक्तिप्रदर्शनाचे संकेत दिले होते. मात्र ऐनवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 25 जून रोजी भंडाऱ्यात काही नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार होता. या प्रवेश मेळाव्याची तयारी शिवसेनेकडून जोरात सुरू होती. खास करून शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर अत्यंत उत्साहित असल्याचे दिसून येत होते. मात्र, राजकारणात नेहमीच अंतिम क्षणाचा निर्णय निर्णायक ठरतो आणि यावेळीही तसेच झाले.

शिवसेना एकनाथ शिंदे गटातीलच काही अंतर्गत मतभेदांमुळे शिंदे यांच्या दौऱ्याला अचानक ब्रेक लागल्याची माहिती मुंबईतील सूत्रांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भंडाऱ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे की, शिवसेनेतील अंतर्गत स्पर्धेमुळेच एकनाथ शिंदे यांना त्यांचा दौरा रद्द करावा लागला. आपल्याच गोटात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचे पडसादच या निर्णयामागे असल्याची जोरदार चर्चा आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पक्षातील विरोधी गटानेच शिंदे यांच्यावर प्रभाव टाकत दौरा रद्द करण्यामध्ये यश मिळवले असल्याचे मुंबईहून सांगितले जात आहे. भोंडेकर हे शिवसेनेच्या रेसमध्ये नेहमीच पुढे असतात, पण त्यांच्याच विरोधकांनी त्यांना यावेळी ओव्हरटेक केल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra : न्यायालयात 76 लाख मतांचे ‘गणित’ ऐरणीवर

पूर्व विदर्भात सावंतशाही

एकनाथ शिंदे यांच्या मनात भोंडेकर यांच्या विरोधात विष पेरण्याचे काम विरोधकांनी केले आहे. आमदार भोंडेकर शिवसेनेतील सक्रिय आणि नेहमीच पुढे राहणारे नेते मानले जातात. मात्र यावेळी त्यांचे विरोधक म्हणजेच दुसऱ्या गटातील नेते अधिक वरचढ ठरले आहेत. पूर्व विदर्भाचे नवीन समन्वयक असलेले दीपक सावंत यांच्या गटातील काही नेत्यांनी भोंडेकर यांना ओव्हरटेक करण्यात यश मिळविले आहे. भंडाऱ्यात 25 जून रोजी होणाऱ्या या पक्षप्रवेश मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक, काँग्रेसचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे एक आणि भारतीय जनता पक्षाचे पाच नेते प्रवेश करणार होते. मात्र आता का प्रवेश स्थगित झाल्याचे दिसत आहे. आता हा प्रवेश होईल की नाही, याबद्दल साशंकता व्यक्त होत आहे.

पूर्व विदर्भात सध्या सावंतशाही प्रभावी ठरू लागली आहे. नवीन नेतृत्व, अंतर्गत गटबाजी आणि प्रत्येकजण वरचढ ठरण्याच्या शर्यतीत शिवसेनेत आपसात स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही या संघर्षाची खरी कसोटी ठरणार आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर गटातील कार्यकर्त्यांनी या निर्णयामागे विरोधी गटाचे डावपेच असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे मुंबईत वरच्या पातळीवरून या दौऱ्यावर ‘ब्रेक’ लागल्याचे स्पष्ट होत आहे. शिवसेनेतील आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या विरोधी गटाच्या योजना, रणनीती आणि संपर्काचे जोरदार प्रयत्न अखेर यशस्वी ठरले, असं बोललं जात आहे.

Maharashtra : गुन्हेगारी आरोपांपासून कार्यकर्त्यांची सुटका

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!