महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : विधान भवनात WWF घडायला मुख्यमंत्रीच जबाबदार 

Vidhan Bhavan Fight : अधिवेशनादरम्यान हाणामारीवरून सरकारला धरले धारेवर 

Post View : 49

Author

राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन म्हणजे लोकशाहीचा शोभेचा बाजार ठरला, गुंडांचे जल्लोषी जलवे आणि जनतेच्या प्रश्नांवर दारिद्र्याची सावली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा संतप्त हल्लाबोल.

ज्या विधिमंडळाकडे महाराष्ट्राची जनता डोळे लावून पाहते, जिथे शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, महिला यांचे प्रश्न ऐकले जातील अशी आशा ठेवते. त्या पवित्र सभागृहात यंदा लोकशाहीची कुस्ती रंगली. रस्त्यावरील गुंड, मवाली थेट विधानभवनात घुसले आणि या सगळ्या अराजकतेचा एकमेव जबाबदार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असा सडेतोड आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. राज्याच्या जनतेला या अधिवेशनात काहीच मिळालं नाही, फक्त धक्कादायक WWF शोचं प्रक्षेपण मिळालं, अशा शब्दांत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

लाडाने पोसलेले गुंड

टिळक भवनात पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी भाजपवर आरोपांचा भडीमार केला. त्यांनी सांगितले की, भाजपने गुंड, मवाली, मकोका आरोपींचा संग लावला आणि त्याच गुंडगिरीचे बीज आज विधानभवनात उगवलं. अक्कलकोटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला करणाऱ्या गुंडाला ‘मुख्यमंत्री तुझ्या पाठीशी आहेत’ असे भाजप नेत्यांचे उद्गार होते, हे भाजपनेच लाडाने पोसलेले गुंड असल्याचा त्यांचा आरोप. मुख्यमंत्री म्हणतात आमदारांना मवाली म्हणणं चुकीचं आहे, पण जे त्यांनी पोसलं तेच आज उगवलंय, असा संतप्त घणाघातही त्यांनी केला. हा डाव आता भाजपावरच उलटतोय आणि जनता हे लक्षात ठेवेल.

राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सर्व गोंधळासाठी नैतिक जबाबदारी घेऊन त्वरित राजीनामा द्यावा, हेच त्यांचं खरी प्रायश्चित ठरेल, अशी मागणी करत सपकाळ यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या राजकीय अधिष्ठानावर प्रश्नचिन्ह लावलं. प्रेसमधून अजून एक स्फोटक दावा करण्यात आला. तो म्हणजे हनीट्रॅप प्रकरणाच्या धागेदोऱ्या थेट समृद्धी महामार्गातील हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराकडे नेतात. सपकाळ यांनी म्हटले की, मुख्यमंत्री म्हणतात काही घडलं नाही, पण ते खोटं बोलत आहेत. हनीट्रॅप प्रकरण लपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण त्यातून समृद्धी महामार्गातील 20 हजार कोटींचा घोटाळा बाहेर येण्याची भीती आहे.

Vijay Wadettiwar : हनीट्रॅपच्या साखळीत अडकून सरकार घडलं

काँग्रेसचा विरोध

या अधिवेशनात शेतकऱ्यांना ना नुकसान भरपाई मिळाली, ना कर्जमाफी, ना पीकविम्यावर चर्चा. बेरोजगारी आणि महागाईचंही वळकटीसुद्धा सरकारने उचललं नाही. लोकशाहीचा हा तमाशा होता, आणि त्याची तिकीटं जनतेने भरली, असा उपरोधिक टोला सपकाळ यांनी लगावला. जनसुरक्षा कायद्यावरही काँग्रेसने ताशेरे ओढले. बजरंग दल, आरएसएस यांनाही या कायद्याच्या कक्षेत आणलं जाईल का? असा थेट सवाल करत, काँग्रेस पक्ष या विधेयकाला आत व बाहेर पूर्ण विरोध करतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची या मुद्यावर भूमिका स्पष्ट नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

हे सत्तेच्या पिंडीवर बसलेले विंचू आहेत. त्यांना ठेचायची सोय नाही, पण जनता यांचा अंत नक्की करेल, अशा शब्दांत सपकाळ यांनी भाजपच्या सत्तेवर तीव्र असंतोष व्यक्त केला. हे पावसाळी अधिवेशन जनतेच्या प्रश्नांपासून दूर, सत्तेच्या खेळात अडकले. काँग्रेसकडून सादर झालेले आरोप हे गंभीर आहेत. गुंडशाही, हनीट्रॅप, भ्रष्टाचार आणि लोकशाहीचा अधःपात. या सर्व प्रकरणांची जबाबदारी कोण घेणार, हे पाहणं आता महाराष्ट्राच्या जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरेल.

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण् यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात द लोकहित लाइव्हपासून केली. त्यांना ऑनलाइन मीडिया आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!