सभागृहात रमी खेळल्याचा आरोप मंत्री माणिकराव कोकाटेंवर झाला. शरद पवार गटानी वातावरण तापवलं, कृषिमंत्र्यांनी जाहिरात असल्याचा दावा करत स्पष्टीकरण दिलं.
राज्यातील राजकारण सध्या अनेक वादग्रस्त घटनांनी गजबजून गेलेलं असतानाच, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. नुकत्याच संपलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात ते चक्क सभागृहात बसून मोबाईलवर ‘रमी’ गेम खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर लगेचच विरोधकांनी कोकाटेंवर घणाघाती टीकास्त्र सोडले.
या व्हिडीओवरून कोकाटेंवर सभागृहात शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी गेम खेळणारे मंत्री, असा टोला लगावण्यात आला. विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नेटकऱ्यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अनेकांनी या प्रकरणावर राजीनाम्याची मागणी केली, तर काहींनी यास गंभीर शिस्तभंग मानत चौकशीची मागणी केली. राजकीय वातावरण तापलेलं असताना खुद्द माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांसमोर येत या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर खुलासा दिला.
चुकीचा संदेश देणारा व्हिडिओ
माध्यमांशी बोलताना कोकाटे म्हणाले की, मी विधानपरिषदेत कामकाजासाठी उपस्थित होतो, तेव्हा सभागृह काही काळासाठी तहकूब झालं होतं. त्या वेळेत मी मोबाईलवर युट्यूब उघडून विधानसभेतील कामकाज पाहत होतो. युट्यूब सुरू केल्यावर अनेकदा जाहिराती येतात, त्यातच एका रमी गेमची जाहिरात आली. मी ती स्किपही केली. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये फक्त 18 सेकंदांचा क्लिप दाखवण्यात आला, जो लोकांना चुकीचा संदेश देतोय.
कोकाटे यांचं स्पष्टीकरण याच इतक्यावर थांबत नाही. त्यांनी स्पष्ट शब्दांत विरोधकांवरही निशाणा साधत सांगितलं की, माझ्या कामावर कोणी बोलत नाही. मी शेतकऱ्यांसाठी जे काम केलंय, त्यावर कुणी प्रश्न उपस्थित करत नाही. टीका नेहमीच माझ्या कपड्यांवर किंवा वैयक्तिक विधानांवर होते. पण माझ्या धोरणांवर नाही. माझं काम पारदर्शक असून सभागृहासारख्या ठिकाणी मी अशा वागणुकीची कल्पनाही करू शकत नाही.
NCP : ‘रमी’ राड्याचा स्फोट, राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेत घुसून मारहाण
जाणीवपूर्वक लक्ष्य केलं
या प्रकरणामध्ये आणखी एक मुद्दा चर्चेत आला तो म्हणजे, सभागृहातील हा व्हिडीओ नेमका कुणी काढला? याबाबतही कोकाटेंना विचारणा झाली. यावर त्यांनी संयम राखत उत्तर दिलं की, व्हिडीओ कोणी काढला याचं मला वाईट वाटत नाही, पण या क्लिपचा वापर करून मला जाणीवपूर्वक लक्ष्य केलं जात आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, पण वैयक्तिक द्वेषातून बदनामीचा प्रकार टाळायला हवा.
कोकाटे यांनी रोहित पवार यांना थेट आव्हानच दिलं की, मी शेतकऱ्यांसाठी जे काम केलं आहे, त्याबद्दल माहिती आहेच. पण रोहित पवार यांनी कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय ठोस योगदान दिलं आहे, हे त्यांनी जनतेसमोर मांडावं. आरोप करणं सोपं आहे, पण स्वतःचं काम दाखवणं तितकंच महत्त्वाचं आहे.
राजकारणात 18 सेकंदांच्या क्लिपने इतका मोठा वाद निर्माण होणं ही नवी बाब नाही. मात्र, सभागृहासारख्या पवित्र ठिकाणी अशा शंका निर्माण होणं, जनतेच्या अपेक्षांना धक्का देणारं ठरतं. कोकाटे यांचं स्पष्टीकरण कितपत विश्वासार्ह वाटतं आणि विरोधक त्यावर काय भूमिका घेतात, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. सध्या मात्र ‘रमी’ गेमवरून उठलेला वाद राजकीय मैदानात पूर्ण ताकदीनं खेळला जात आहे, हे निश्चित.
