नागपूरच्या रस्त्यांवर ट्रॅव्हल्सच्या दादागिरीवर अखेर पोलिसांचा थेट ब्रेक बसला आहे. 12 ऑगस्टपासून एक महिना, शहराच्या प्रमुख मार्गांवर भारी वाहनांना ‘नो-एंट्री’चा कडक फर्मान लागू होणार आहे.
नागपूरकरांनो, ट्रॅफिकच्या कोंडीत घाम गाळत प्रवास करणाऱ्यांसाठी आता मोठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर दररोज घुसखोरी करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बेमुर्वत दादागिरीवर अखेर पोलिसांनी थेट ब्रेक मारला आहे. 30 लाख लोकसंख्येच्या नागपूरमध्ये आधीच 20 लाख दुचाक्या आणि 5 लाख चारचाक्यांचा तुफान वावर आहे. त्यात भर म्हणून शहराच्या हृदयस्थानी घुसणाऱ्या भारी वाहनांमुळे रस्त्यांचा श्वास घोटला जात होता. वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि रुग्णवाहिकांच्या अडथळ्यांनी नागपूरचा रस्त्यांवरील जीवघेणा ताण वाढवला होता. पण आता वाहतूक विभागाने ठरवलंय… बस्स! आता नाही.
12 ऑगस्टपासून ते 12 सप्टेंबरपर्यंत तब्बल एक महिना, शहरातील मुख्य मार्गांवर येणाऱ्या ट्रॅव्हल्सला सकाळी 8 ते रात्री 9 या वेळेत प्रवेशबंदी लागू राहणार आहे. या काळात इनर रिंग रोडच्या आत कुठल्याही ठिकाणी ट्रॅव्हल्सचे पार्किंग, पिकअप किंवा ड्रॉप बंद असणार आहे. पोलिसांनी स्पष्ट केलंय की, उल्लंघन केल्यास थेट दंड आणि वाहन जप्त करण्याची कारवाई होईल. यामध्ये सी.ए. रोड, जाधव चौक, विजय टॉकीज चौक, कॉटन मार्केट चौक, धरमपेठ, रेन्बो बस स्टॉप, यशवंत स्टेडियम, अमरावती रोड, रवीनगर, ग्रेट नाग रोड, उमरेड रोड, छत्रपती चौक, हिंगणा रोड, टेलिफोन एक्सचेंज, टाकळी रोड अशा शहराच्या गजबजलेल्या आणि मध्यवर्ती भागांचा समावेश आहे.
Vijay Wadettiwar : सत्ता चोरली, मतं चोरली, पण आवाज कसा चोरणार?
मोहिमेची आखणी
हा निर्णय फक्त ट्रॅफिक कमी करण्यासाठी नाही तर अपघात टाळण्यासाठी, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवांना वेळेवर पोहोचण्यासाठी अत्यावश्यक आहे. दररोज हजारो प्रवासी, शाळकरी मुले, ऑफिसला जाणारे नागरिक आणि ट्रॅव्हल्सच्या कोंडीत अडकून बसत होते. ट्रॅव्हल्सच्या अव्यवस्थित पार्किंगमुळे रस्त्यांवर जणू ‘चालते पार्किंग लॉट’ तयार होत होते. यातून सुटका मिळवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या मोहिमेची आखणी केली आहे. या बंदीला काही अपवाद राहतील. रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवा, शाळांच्या बसेस, एस.टी. महामंडळाच्या बसेस, उद्योग क्षेत्रातील आवश्यक वाहतूक, तसेच लग्न-समारंभांसाठी परवानगी घेतलेली वाहने यांना प्रवेश दिला जाईल. पण बाकी कोणतंही कारण देऊन ट्रॅव्हल्सला आता शहराच्या रस्त्यांवर धुडगूस घालू दिला जाणार नाही.
वाहतूक पोलिसांचे हे पाऊल शहराला केवळ मोकळा श्वासच देणार नाही तर नागपूरच्या ट्रॅफिकच्या इतिहासात ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. यामुळे शहरात अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा आहे, तसेच प्रवाशांचा वेळ वाचेल. पोलिसांनी नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले असून, नो एंट्री म्हणजे नो एंट्रीच, असा कडक इशारा दिला आहे. आता पाहायचं इतकंच की नागपूरकर या नियमांना किती पाठिंबा देतात आणि ट्रॅफिकमुक्त शहराच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवतात. कारण पोलिसांनी हिरवा सिग्नल नाही तर लालच दाखवलाय आणि या वेळी हा लाल सिग्नल मोडणाऱ्यांना गाडी थेट पोलिसांच्या हद्दीत पार्क करावी लागणार आहे.
Police Recruitment : महाराष्ट्राला मिळणार लवकरच नवीन सुरक्षा कवच
