महाराष्ट्रातील शाळांमध्ये बनावट शालार्थ आयडींचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. काही बोगस शिक्षकांच्या नियुक्तीवर सायबर पोलिसांकडून अटक होणार आहे.
महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वात भूकंप घडवणारा शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट ओळखपत्रांच्या आधारे तब्बल 1 हजार 56 हून अधिक बोगस शिक्षकांनी शाळांमध्ये नोकऱ्या मिळवल्या, ही धक्कादायक माहिती समोर आली. या घोटाळ्याने केवळ शिक्षकांच्या नियुक्तीच नव्हे, तर पगारातून टक्केवारी वसूल करणाऱ्या भ्रष्टाचाराच्या साखळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाने शैक्षणिक व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षणाचा दर्जा धोक्यात आला आहे. अशी भीती आता सर्वत्र व्यक्त होत आहे. हा घोटाळा म्हणजे फक्त आर्थिक फसवणूक नाही, तर शैक्षणिक मूल्यांवर हल्ला आहे, ज्यामुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले आहे.
सायबर पोलिसांच्या तपासातून 1 हजार 80 शालार्थ आयडींपैकी 680 शिक्षकांचे आयडी बोगस असल्याचे उघड झाले आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) या सर्व बोगस शिक्षकांना अटक करण्याचे संकेत दिले आहेत. या बातमीने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिक्षण क्षेत्रातील हा घोटाळा केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित नसून, त्याचे पडसाद राज्यभर पसरले आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवणाऱ्या या शिक्षकांनी भ्रष्टाचाराची साखळी तयार केली. ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी, शिक्षणाधिकारी आणि कर्मचारी सामील असल्याचा संशय आहे. गेल्या पाच महिन्यांपासून हा घोटाळा चर्चेत आहे. जेव्हा नागपूर विभागातून प्रथम याची सुरुवात झाली. 12 मार्च रोजी सायबर पोलिसांकडे पहिली तक्रार दाखल झाली.
Chandrashekhar Bawankule : सरकार उलथवणं सोपं नाही, आमचं सरकार भारी आहे
विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात
उपसंचालक उल्हास नरड यांच्या नेतृत्वाखालील समितीने 233 शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचा अहवाल सादर केला. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि एकूण 1 हजार 80 शिक्षकांपैकी 633 जणांच्या नियुक्त्या बोगस असल्याचे समोर आले. या तपासाने शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे किळसवाणे वास्तव उघड केले. तपासादरम्यान वरिष्ठ अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र, अजूनही 680 बोगस शिक्षकांवर कारवाई बाकी आहे. या शिक्षकांनी बनावट कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने शालार्थ आयडी मिळवले. या प्रकरणात आर्थिक व्यवहारांचा मोठा खेळ झाल्याचे तपासातून उघड झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील या भ्रष्टाचाराने सामान्य माणसाचा विश्वास डळमळीत झाला आहे, तर विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. या घोटाळ्याचा मास्टरमाइंड मानला जाणारा माजी शिक्षण उपसंचालक सतीश मेंढे, जो भंडारा-गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे यांचा भाऊ आहे. विशेष तपास पथकाने मुख्य आरोपी नीलेश वाघमारे याला अटक केली. पण सतीश मेंढे याच्यावर पोलिसांचा हात पडलेला नाही. विशेष म्हणजे, तिन्ही न्यायालयांनी त्याला अटकपूर्व जामीन नाकारला आहे. तरीही त्याची अटक होत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोलिसांचा तपास संथ गतीने सुरू असल्याचे दिसते, ज्यामुळे मेंढेच्या अटकेवर संशय व्यक्त होत आहे. या घोटाळ्याने महाराष्ट्रातील शैक्षणिक व्यवस्थेचा पाया हादरला आहे.
सरकार आणि शिक्षण विभागाला आता कठोर पावले उचलावी लागणार आहेत. बोगस शिक्षकांना अटक करणे, भ्रष्टाचाराची साखळी तोडणे आणि विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करणे ही आता प्राथमिकता आहे. हा घोटाळा केवळ कागदपत्रांपुरता मर्यादित नसून, शिक्षणाच्या पवित्रतेवर घाला आहे.
