खासदार अमर काळे यांनी वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था एमगिरीला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्लीत झालेल्या भेटीत त्यांनी या संस्थेच्या विकासासाठी ठोस मागण्या मांडत ग्रामीण भारताच्या समृद्धीला नवी दिशा दिली.
वर्धा, ही महात्मा गांधींच्या विचारांनी प्रेरित भूमी, पुन्हा एकदा इतिहासाच्या पानांवर नव्या उत्साहाने झळकणार आहे. खासदार अमर काळे यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. वर्धेतील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्था अर्थात एमगिरीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सखोल चर्चा केली. ही संस्था, जी केंद्र सरकारच्या लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्यरत आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा बळकट करण्याचे स्वप्न बाळगून आहे. खादी आणि ग्रामीण उद्योगांना चालना देणारी ही संस्था 1955 मध्ये जमनालाल बजाज केंद्रीय अनुसंधान संस्था म्हणून स्थापन झाली. पुढे 2001 मध्ये दिल्ली आयआयटीच्या सहकार्याने तिला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आणि तिचे नामकरण एमगिरी असे झाले. महात्मा गांधींच्या स्वावलंबनाच्या तत्त्वावर आधारित ही संस्था ग्रामीण औद्योगिकरणाला नवी दिशा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
भेटीत खासदार काळे यांनी एमगिरीच्या प्रचंड क्षमतेवर प्रकाश टाकला. तिला जागतिक पातळीवर नावलौकिक मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी संस्थेच्या विस्तारासाठी 30 एकर जागा, संशोधक आणि कर्मचारीवर्गाची उपलब्धता यांसारख्या मागण्या पंतप्रधानांसमोर मांडल्या. या मागण्यांमागे ग्रामीण भारताच्या समृद्धीचे स्वप्न आहे. जे एमगिरीच्या माध्यमातून साकार होऊ शकते. संस्थेच्या संचालक डॉ. श्याम मुरकुटे यांच्याशी झालेल्या चर्चेतून काळे यांना या संस्थेची खरी ताकद आणि संभाव्यता समजली. त्यांनी एमगिरीला सेंटर फॉर एक्सेलन्स म्हणून विकसित करण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. जेणेकरून ती ग्रामीण उद्योगांच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर्श ठरेल.
एमगिरीच्या कार्याबद्दल कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भेटीत एमगिरीच्या कार्याबद्दल कौतुक केले आणि संस्थेच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. ग्रामीण भागातील लाखो लोकांना रोजगार देण्याची क्षमता असलेली ही संस्था आजही आपले महत्त्व टिकवून आहे, ही बाब प्रशंसनीय आहे, असे त्यांनी नमूद केले. एमगिरीच्या सक्षमीकरणासाठी ठोस धोरण आखले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. खासदार काळे यांनी पंतप्रधानांना वर्ध्यात येऊन संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण दिले. ज्याला पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला. ही भेट केवळ विकासकामांपुरतीच मर्यादित होती, असे काळे यांनी स्पष्ट केले. ज्यामुळे एमगिरीच्या भविष्याबाबत आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
एमगिरी ही केवळ एक संस्था नसून, ती महात्मा गांधींच्या स्वावलंबन आणि ग्रामीण समृद्धीच्या विचारांचे जिवंत प्रतीक आहे. खादी उत्पादनापासून ते ग्रामीण औद्योगिकरणापर्यंत, ही संस्था ग्रामीण भारताच्या आर्थिक उन्नतीसाठी सतत कार्यरत आहे. तिच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कारागिरांना आणि लघु उद्योजकांना प्रोत्साहन मिळाले आहे. खासदार काळे यांनी मांडलेल्या मागण्यांमुळे आणि पंतप्रधानांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे एमगिरीच्या विकासाला नवे बळ मिळणार आहे. ही संस्था भविष्यात जागतिक स्तरावर ग्रामीण उद्योगांचा आदर्श बनण्याची क्षमता बाळगून आहे. यासाठी केंद्र सरकारचे पाठबळ महत्त्वाचे ठरणार आहे.
