महाराष्ट्रातील गेल्या काही महिन्यांपासून मत चोरीचा वाद चांगलाच चांगला गाजत आहे. काँग्रेसकडून भाजप व निवडणूक आयोगावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर आता काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पवित्र्याला काळिमा फासणाऱ्या मतचोरीच्या आरोपांनी राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षावर (भाजप) आणि निवडणूक आयोगावर संगनमताने मतचोरीचा डाव रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणी ठोस पुरावे सादर करत मतचोरीचा पर्दाफाश केला आहे. आता महादेवपुरा मतदारसंघातील मतदान प्रक्रियाही भयंकरपणे गडबडलेली आहे. ज्यामुळे भाजप आणि आयोगाच्या भ्रष्ट युतीचा पर्दाफाश झाला आहे. पण ही आग केवळ महादेवपूरापुरती मर्यादित नसून, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा विधानसभा मतदारसंघातही असाच प्रकार घडल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
घडीत प्रकरणी गेल्या 11 महिन्यांपासून कारवाईच्या प्रतीक्षेत असलेल्या काँग्रेसने आता थेट न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. गांधी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत अतुल लोंढे यांनी मतचोरीच्या या कथित कटाची सविस्तर माहिती उलगडली आहे. त्यांच्या शब्दांतून एक धक्कादायक चित्र उभे राहते. जणू काही निवडणूक प्रक्रिया हा एखाद्या रहस्यमय कादंबरीचा भाग आहे. जिथे बोगस मतदार, बनावट नोंदणी आणि गूढ IP पत्ते यांचा खेळ रंगला आहे. त्यांनी सांगितले की, राजुरा मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत 55 हजार मतदारांची संशयास्पद वाढ झाली. विशेष म्हणजे, 1 ऑक्टोबर 2024 ते 15 ऑक्टोबर 2024 कालावधीत 11 हजार 667 बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाली.
राजकीय वातावरणाची गडबड
काँग्रेसचे उमेदवार सुभाष धोटे यांनी याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर 6 हजार 853 मते डिलिट करण्यात आली. पण याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. लोंढे यांनी प्रश्न उपस्थित केला, बोगस मतदार नोंदणीचे IP पत्ते, ईमेल आयडी आणि मोबाइल क्रमांक का लपवले जात आहेत? यामागील चोर कोण, हे उघड होऊ नये म्हणून प्रशासन गप्प का आहे? अतुल लोंढे यांनी या प्रकरणी आपली भूमिका अत्यंत ठामपणे मांडली आहे. लोंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राजुरा मतदारसंघातील भाजप उमेदवाराकडे 61 लाख रुपये आणि निवडणूक साहित्य सापडले. ज्याची नोंद गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये झाली. पण यावरही कारवाईचा पत्ता नाही.
निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांना वारंवार निवेदने देऊनही हा खेळ सुरू आहे. आता आम्ही जनतेच्या न्यायालयातच नाही, तर कायदेशीर लढाईतही उतरणार आहोत, असे लोंढे यांनी ठणकावून सांगितले. या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झाले असून, लोकशाहीच्या मुळावरच घाव घालणारा हा प्रकार असल्याचे लोंढे यांचे म्हणणे आहे. सुभाष धोटे यांनीही या पत्रकार परिषदेत मतचोरीच्या प्रकरणाची सविस्तर माहिती देताना प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवले. आम्ही गेल्या 11 महिन्यांपासून कारवाईची वाट पाहत आहोत. पण आता आमचा संयम संपला आहे. जर पुढील एका महिन्यात कारवाई झाली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असे धोटे यांनी स्पष्ट केले.
Shiv Sena : गणेश विसर्जनाच्या गोंधळात अल्पवयीन मुलीचा अब्रूभंग
लोंढे यांनी या लढ्याला पाठिंबा देताना सांगितले की, काँग्रेस पक्ष हा लढा जनतेच्या हक्कांसाठी लढत आहे. यापुढेही लढत राहील. महाराष्ट्राच्या या राजकीय नाट्यात मतचोरीचा हा प्रकार एका मोठ्या षडयंत्राचा भाग असल्याचा संशय काँग्रेस व्यक्त करत आहे. अतुल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हा मुद्दा आता राष्ट्रीय पातळीवर नेला असून, येत्या काळात याचे पडसाद देशभर उमटण्याची शक्यता आहे.
